
राज्यातील महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना टार्गेट करून भाजपमध्ये नेले जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीसारखे पक्ष फोडूनही त्यांचे समाधान झाले नाही. आता छोट्या छोट्या नेते मंडळींनाही टारगेट केले जाऊ लागले आहे. मतदानाच्या दिवसापर्यंत भाजपकडून हा दबावतंत्राच्या वापर केला जात आहे. या दबावतंत्रामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. यामुळेच जनतेने ही निवडणूक त्यांच्या हातात घेतली आहे. माढा लोकसभेचा खासदार आता जनताच निवडणार आहे, असे उद्गार शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी काढले आहेत. ते पंढरपूर तालुक्यातील प्रचार सभेमध्ये बोलत होते.
मोहिते पाटील कुटुंबाने भाजपमधून काढता पाय घेत,महाविकास आघाडीची उमेदवारी घेतली आहे. यामुळे महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यामुळेच या मतदार संघात एकापाठोपाठ एक नेत्यांना टारगेट केले जात आहे. याचा धागा पकडून शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी भाजपावर खरमरीत टीका केली.माढा लोकसभा मतदार संघात जनता हतबल झाली आहे. महायुतीकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. या दबावाच्या राजकारणास जनता कंटाळली आहे. यामुळेच ही निवडणूक आता जनतेने हाती घेतली आहे. जनतेने आता तुतारी हाती घेतली आहे. या मतदार संघात तुतारीचाच आवाज घुमणार असल्याचे त्यांनी सांगितले.