
पंढरपूर (प्रतिनिधी)
राज्य सरकारने आणलेली माझी लाडकी बहीण योजना नावाजण्यासारखी असली तरीही, या योजनेला एजंटगिरीचे ग्रहण लागले आहे. या एजंटांचा बंदोबस्त करून, या योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी, पंढरपूर शहर काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
मागील चार दिवसापूर्वी राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिलांच्या सबलीकरणासाठी, माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत २१ ते ६० वयो वर्षापर्यंतच्या महिलांना, दरमहा दीड हजार रुपये देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.
या योजनेचे जनतेतून मोठे स्वागत झाले आहे.
ही योजना महिलांच्या सबलीकरणासाठी असली तरीही, या योजनेत सामील होण्यासाठी अल्प मुदत देण्यात आली आहे. यामुळे महिलांची उत्पन्नाचे दाखले मिळवण्यासाठी, पहिल्या दिवसापासूनच झुंबड उडाली आहे. यात तलाठी कार्यालयात एजंट बांधवांनी धुडगूस घातला आहे. महिलांकडून ज्यादा पैशाची मागणी करून दाखले देण्यात येत आहेत. याचवेळी ही नोंदणी करण्यासाठी नोंदणी कक्ष अपुरे पडू लागले आहेत. या नोंदणी कक्षांच्या संख्येत वाढ करावी, तसेच या योजनेत सहभागी होण्यासाठी देण्यात आलेली मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी पंढरपूर शहर काँग्रेसकडून करण्यात आली आहे.