
पंढरपूर (प्रतिनिधी)
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा
मोहिते पाटील कुटुंबास राजकीय जीवदान मिळाले आहे. राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांनी त्यांना स्वतःच्या तंबूत घेत, जिल्ह्याच्या राजकारणाची धुरा मोहिते पाटील कुटुंबाच्या हाती दिली आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पदरात खासदारकी पडली. भाजपाचे आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांचे पुनर्वसन शरद पवार लवकरच करतील अशी आशा आहे.
लोकसभेच्या निवडणुका संपताच , राज्यात विधानसभा निवडणुकीचा महोल तयार झाला. तेव्हापासूनच आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांना महाविकास आघाडीतून आमदार होण्याची घाई झाल्याचे दिसून आले. सोलापूर जिल्ह्यात जवळजवळ सर्वच तालुक्यात मोहिते पाटील कुटुंबांला मानणारा गट अस्तित्वात आहे. माढा आणि करमाळा तालुक्यात त्यांचे कार्यकर्ते गावोगाव विखुरले आहेत.
माढा विधानसभा मतदारसंघात आ. बबनदादा शिंदे यांचा वरचष्मा आहे. परंतु बबनदादा शिंदे यांनी मागील काळात शरद पवार राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत, अजित पवार राष्ट्रवादीकडे धाव घेतली होती. यामुळे या निवडणुकीत त्यांची पंचायत झाली आहे. काळाची पावले ओळखून त्यांनीही शरद पवार यांच्याकडे उमेदवारीसाठी साकडे घातले आहे. शरद पवार यांची तुतारी हाती घेऊन निवडणूक लढवल्यास फायदा होऊ शकतो, हे गणित त्यांच्या ध्यानात आले आहे. परंतु शरद पवार यांनी त्यांना कोणताही शब्द दिला नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी
भाजपाचे आ. रणजीतसिंह मोहिते हेही इच्छुक आहेत. तेही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून. गुरुवारी त्यांनी याबाबत राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली आहे. माढा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेल्यास , काँग्रेसचे उमेदवार रणजितसिंह मोहिते पाटील हेच असणार, हे निश्चितही झाले आहे. मा. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूजमध्ये मोठा मेळावा भरवण्यात आला होता. या मेळाव्यासाठी
माढा विधानसभा मतदारसंघातून हजारो नागरिक उपस्थित राहिले होते. माढा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी कंबर कसली आहे. माढा आणि पंढरपूर मंगळवेढा या मतदार संघात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. यासाठी या दोन्ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे झाल्यास आ. रणजीतसिंह मोहिते पाटील आणि भगीरथ भालके या दोघांच्याही उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.