
पंढरपूर (प्रतिनिधी)
मंगळवेढा आठवडा बाजारात शेतकरी आणि नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. या आठवडा बाजारास अचानक आ. समाधान आवताडे यांनी भेट दिली. या बाजारासाठी कोणकोणती कामे करावयाची आहेत, याचे प्रस्ताव तयार करा,
निधीची कमतरता पडू देणार नाही, असे प्रशासनातील अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी सोबत असणारे पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि नगरपालिका अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
आ. समाधान आवताडे लोकसभा निवडणुकीनंतर
चांगलेच ऍक्टिव्ह झाले आहेत. सोमवार दि.१७ जून रोजी त्यांनी मंगळवेढ्यातील आठवडा बाजारास भेट दिली.यावेळी तेथील शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला. येथील बाजारात नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या आठवडा बाजारात सिमेंट काँक्रीटचे कट्टे आहेत. परंतु या कट्ट्यांवर खोकी धारकांनी अतिक्रमण केले आहे. अनेक कट्ट्यांवर मुरूम टाकण्याचा विचित्र प्रयोग नगरपालिकेकडून करण्यात आला आहे.
काही कट्ट्यांवर खाजगी वाहने लावण्यात येत आहेत. यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना कट्ट्याच्या खाली चिखलात बसावे लागत आहेत. ही परिस्थिती पाहून आ. समाधान आवताडे यांनी उग्र रूप धारण केले. आठवडा बाजारावर तुमचे लक्ष नाही काय ? कामावर लक्ष ठेवा , असा सज्जड दम त्यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला.
आठवडा बाजारमध्ये साठत असलेले पाणी बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतात ? याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे अधिकाऱ्यांना सुनावले. आठवडा बाजारात शेतकऱ्यांचे हाल आपण कदापिही सहन करणार नाही, असे अधिकाऱ्यांना सुनावले. ग्राहकांच्या वाहनास व्यवस्थित पार्किंगची सोय नगरपालिकेकडून करण्यात आली नाही. रस्त्यावर वाहने लावून वाहतुकीस अडथळा होत आहेत, याबाबत पोलीस प्रशासनास त्यांनी खडसावले. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. आ. अवताडे यांनी अचानक बाजार तळाची पाहणी केल्याने अधिकाऱ्यांचे चांगले दणाणले.यावेळी त्यांच्यासमवेत प्रशासन अधिकारी साळुंखे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, शेतकरी संघटनेचे युवराज घुले, पोलीस निरीक्षक रणजीत माने, महादेव जाधव सचिन शिंदे आदी उपस्थित होते.
मंगळवेढा शहरासाठी कोट्यावधींचा निधी आणला असून अद्याप टेंडर होऊनही, काही ठेकेदारांनी कामे सुरू केली नाहीत. ती कामे तत्काळ सुरू करावीत. जे ठेकेदार कामे सुरू करत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करा, पण कामे तात्काळ सुरू करा, अशा सूचनाही आ. समाधान आवताडे यांनी नगरपालिका प्रशासनास दिल्या.