
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूरचे जेष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे खंदे समर्थक, प्रकाश पाटील पंढरीत वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरीत झळकणारे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या बॅनरवर त्यांचा भावी आमदार म्हणून केला गेलेला उल्लेख, मोठा चर्चेचा विषय बनला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सु.रा. परिचारक पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील यांचा २४ जुलै रोजी वाढदिवस होता. या वाढदिवसाच्या निमित्ताने
त्यांचे कौतुक खुद्द काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे यांनी केले होते. या होल्डिंगवर पंढरपूरचे भावी आमदार प्रकाश पाटील असा उल्लेख होता. प्रकाश पाटील यांचा उल्लेख भावी आमदार म्हणून केल्याने, अनेकांच्या पोटात राजकीय पोटशूळही उठला असेल , परंतु या होल्डिंगची चर्चा पंढरपूर शहरात दिवसभर सुरू होती.
याबाबत पंढरपूरचे तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे यांना विचारणा केली असता, त्यांनी मोठे समर्पक उत्तर दिले. याबाबत बोलताना ते म्हणाले की, पंढरपूर तालुक्यात मोठी राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. अनेक राजकीय नेते आमदारकीच्या शर्यतीत उभे आहेत. महाविकास आघाडीला ही जागा जिंकण्यासाठी, काँग्रेस पक्ष हा एकमेव पर्याय आहे.पंढरपूर तालुका हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. कै. सुधाकरपंत परिचारक यांनी कित्येकदा काँग्रेसमधून निवडणूक लढवून विजय मिळवला होता. कालांतराने कै. भारत भालके यांच्या काळात ही जागा काँग्रेसकडूनच लढवण्यात आली होती. पुन्हा कै. भारत भालके हे राष्ट्रवादीत गेल्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला देण्यात आली होती.
त्यांच्या निधनानंतर ही जागा भाजपाने बळकावली. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, भाजपकडे दोन प्रबळ दावेदार आहेत. याचवेळी राष्ट्रवादीकडे
कोणताही प्रबळ दावेदार नाही. याच पार्श्वभूमीवर
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची ही जागा पुन्हा काँग्रेसच्या वाट्याला मिळावी, अशी मागणी आपण स्वतः महाविकास आघाडीच्या नेते मंडळींकडे करणार आहोत.
प्रकाश पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून
काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्यामुळेच काँग्रेस पक्ष पंढरपूर तालुक्यात टिकून आहे. महाविकास आघाडीकडून निवडणूक लढल्यास, त्यांचा विजय सध्याच्या परिस्थितीत तरी निश्चित होणार आहे, अशी प्रतिक्रिया हणमंत मोरे यांनी यावेळी दिली.