
पंढरपूर (प्रतिनिधी)
करकंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक अवैध धंदे चालत असल्याच्या तक्रारी मागील काही दिवसांपूर्वी झाल्या होत्या. आता करकंब पोलीस ठाण्यापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पांढरेवाडी गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी, बाळासाहेब चिखलकर नावाच्या युवकाने कंबर कसली आहे. मागील अनेक दिवसापासून त्यांचे हे प्रयत्न सुरू असून, आता चक्क पांढरेवाडी गावच्या स्मशानभूमीतच आमरण उपोषण छेडले आहे.
पांढरेवाडी गावात अवैध दारू धंदे, मटका व जुगार धंद्यांना उत आला आहे. या गावातील अनेक कुटुंबांची दारुमुळे वाताहात झाली आहे. समाजाला हानी पोहोचवणारे हे अवैध धंदे बंद करण्यासाठी, येथील तरुण अनेक दिवसापासून झगडत आहे. शुक्रवार दि.
१९ जुलैपासून त्यांनी येथील स्मशानभूमीत आमरण उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणाकडे पांढरेवाडी गावातील पुरुष वर्गाने पाठ फिरवली असली तरी, येथील महिला वर्गाने
या उपोषणास उचलून धरले आहे. महिलांचा वाढता पाठिंबा वाढतच राहिल्यास, हे उपोषणरुपी आंदोलन काही दिवसातच उग्र स्वरूप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.