प्रपंचाच्या व्यापात दोन तपाहून जास्त काळ घालवला, या काळातील
सुख दुःखांना शेअर करण्यासाठी अख्खा वर्गच
एकत्र आला. प्रपंचातील सर्व गोष्टी विसरून शालेय जीवनातील प्रसंगांना उजाळा दिला. मग काय
शालेय जीवनातील मित्रांशी
गप्पा रंगल्या. प्रत्येकाच्या प्रपंचातील अनेक प्रसंगांची एकमेकांना देवाणघेवाण झाली. या प्रसंगाने पंढरपूर तालुक्यातील भोसे गावातील यशवंत विद्यालयात धमाल उडाली.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत, अजूनही माणुसकी आणि परंपरांना स्थान आहे. याची प्रचिती भोसे परिसरास एप्रिल महिन्याच्या अखेरीस आली. या विद्यालयात शिकलेल्या सन १९९५-९६ साली दहावी उत्तीर्ण झालेल्या बॅचचा स्नेह मेळावा या विद्यालयात भरवण्यात आला. तब्बल २८ वर्षानंतर ही मंडळी जबाबदार नागरिक म्हणून एकत्र आली. हा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
या विद्यालयातील पहिलाच मेळावा ठरला. यावेळी तत्कालीन गुरुजन वर्गही
या मेळाव्यास हजर झाला. आपले विद्यार्थी किती यशस्वी झालेत, त्यांना किती सामाजिक जबाबदारीचे भान आहे, याचा साक्षात्कार तत्कालीन गुरुजन वर्गासही झाला. त्यांचे अंतकरण
कळवळून गेले.
या स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नागनाथ काळे सर हे होते. प्राचार्य कारंडे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याचवेळी गुरुजन वर्ग पांढरे सर , यादव मॅडम, भास्कर बंगाळे, माळवदकर सर, काझी सर, देशपांडे, ताकतोडे, कुंभार सर तर भडकवाड आणि टरले गुरुजींनी आपले मनोगत व्यक्त केले.
मेळाव्याचे प्रास्ताविक तुकाराम कोरके यांनी केले. या कार्यक्रमासाठी मुंबई, सांगली, रत्नागिरी, पुणे, करमाळा, बार्शी, सांगोला, सोलापूर तसेच भोसे परिसरातील भागातून माजी विद्यार्थी उपस्थित होते. दोन तपानंतर हे सर्व विद्यार्थी एकत्र आल्यामुळे तसेच गुरुजनांची भेट झाल्यामुळे, विद्यार्थी आणि गुरुजन यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत झाला होता. काही मित्रमंडळींनी भावनिक होऊन आनंदाश्रुंना वाट मोकळी करून दिली.
आपण ज्या शाळेत घडलो त्या शाळेस मदत म्हणून या विद्यार्थी वर्गाने २ ब्रास पेवर ब्लॉक आणि मजुरीचा खर्च उचलला. यावेळी अश्विनी जमदाडे या माजी विद्यार्थिनींने सर्व गुरुजन वर्गास तुकाराम गाथा सुपूर्द केला. जेवणाची व्यवस्था आप्पासाहेब थिटे यांनी केली. या स्नेह मेळाव्यात माजी
विद्यार्थ्यांमध्ये विशाल गायकवाड, चंद्रकांत उलभगत, प्रा. चंद्रप्रभा माने, सारिका गावंधरे
यांनी मनोगत व्यक्त केले.