पंढरपुरातील ६५ एकरात मोकाट कुत्र्यांचा वावर, नागरिक हैराण
कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची समाजसेवक संजय ननवरे यांची मागणी

तीर्थक्षेत्र पंढरपूर शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. यामुळेच मध्यंतरीच्या काळात पंढरपूर नगरपरिषदेने त्यांच्या बंदोबस्तासाठी निविदाही काढली होती. या निविदेची गरज किती होती ? हे आता पुढे येऊ लागले आहे.
पंढरपूर शहरालगत असलेल्या ६५ एकर परिसरात शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक फेरफटका मारावयास जातात. सकाळी सकाळी या ठिकाणी अनेक नागरिक
मॉर्निंग वॉकचा अनुभव घेत असतात. पंढरपुरातील समाजसेवक संजय ननवरे हेही मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य आहेत. संजय ननवरे यांना मोकाट कुत्र्यांबाबत वाईट अनुभव आला.
शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळी त्यांच्या ग्रुपचे एक सदस्य रस्त्यावरून भरभर चालत असताना मागून एक मोकाट कुत्रे आले, आणि त्यांचा मागून चावा घेतला. या घटनेमुळे सर्वच सदस्य जागे झाले. त्यांनी त्याचं ठिकाणावरून व्हिडिओ शेअर केला. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे किती गरजेचे आहे, हे या व्हिडिओमधून समोर आणले.
पंढरपुरातील ६५ एकर परिसर वर्षातील चार यात्रा वगळता कायमच रिकामा असतो. या ठिकाणी रिकामटेकडे नागरिक आणि मोकाट कुत्री दिवसभर फिरत असतात. एखादी दुचाकी चालली असल्यास त्याचा पाठलाग ही कुत्री करतात. घाबरलेला दुचाकीस्वाराचा वाहनावरील ताबा अचानक सुटतो आणि तो पुढे जाऊन फरपटल्याशिवाय राहत नाही. असे अनेक अपघात आजपर्यंत या मोकाट कुत्र्यांमुळे झाले आहेत. या मोकाट कुत्र्यांच्या धास्तीमुळे मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे शासन आरोग्यदायी समाजाची कल्पना करीत आहे, दुसऱ्या बाजूला मात्र
आरोग्य राखण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या नागरिकांना असा नाहक त्रास होत आहे, याची दखल पंढरपूर नगरपरिषद घेणार काय ? याकडे पंढरपूर वाशियांचे लक्ष लागले आहे.