
विद्यार्थ्यांना जात धर्म न पाहता, शंभर टक्के गणवेश मोफत दिले जातील, यासंदर्भात पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबवण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. विरोधी पक्ष नेत्यांनी विद्यार्थ्यांच्या गणवेशा बाबतचा मुद्दा उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना ते बोलत होते.
मुलींच्या शिक्षणासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती पन्नास टक्के होती, आता शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत गणवेशाच्या गुणवत्तेत कोणता फरक पडला आहे हे देखील सांगितले आहे. आम्हालाच सर्व कळतंय असं नाही, आमच्याही हातून चुका होऊ शकतात, विरोधकांनी राजकारण न करता, निदर्शनास आणून दिल्यास त्यात निश्चित सुधारणा केली जाईल, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
राज्य सरकारने गेल्या सव्वा दोन वर्षात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर ठेवले आहे. मुख्यमंत्र्यांनी काही योजना देखील घोषित केल्या आहेत. यामध्ये मुख्यमंत्री तीर्थ योजना आहे, ज्यामध्ये राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे, ज्यामध्ये केंद्र सरकारच्या वयोश्री योजनेमध्ये जे गॅजेट नाहीत, साठ वर्षाच्या वरील लोकांना लागतात, ते सर्व गॅजेट राज्यातील वयोश्री योजनेतून देण्यात येणार आहेत. गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर ठेवत, राज्य सरकारने अर्थव्यवस्थेचा मोठा विस्तार केला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.