
पंढरपूर (प्रतिनिधी)
राज्य सरकारने ‘माझी लाडकी बहिण” ही योजना जाहीर केली. आर्थिकदृष्ट्या कमजोर असणाऱ्या महिलांना सहाय्य मिळणार असल्याने, या योजनेचे पडघम संपूर्ण राज्यात वाजले. परंतु लोक आग्रहास्तव या योजनेतील अटी शिथिल करण्यात आल्या. उत्पन्नाचा दाखला, ही अट रद्द केल्यामुळे, तर ही योजना मोठी विस्तारणार आहे. यातच आता चार चाकी वाहनाची अटही रद्द करण्याची मागणी होऊ लागल्याने,
ही योजना बासनात गुंडाळणार तर नाही ना ..असे प्रश्न पडू लागले आहेत.
राज्याचे अर्थमंत्री ना. अजित पवार यांनी
राज्य सरकारची ही महत्वाकांक्षी योजना,
अर्थसंकल्प सादर करताना जाहीर केली. महिलांच्या सबलीकरणासाठी राज्य सरकारने आखलेली ही योजना १ जुलैपासूनच सुरू होणार असल्याची माहिती मिळताच, महिला वर्गात आनंदाचे वातावरण पसरले. परंतु या योजनेच्या लाभासाठी आवश्यक असणारे उत्पन्नाचे दाखले मिळवण्यासाठी, महिलांची तोबा गर्दी महा ई सेवा केंद्रांवर होऊ लागली.यात दलालांचे उखळ पांढरे होऊ लागले. यावरून मुख्यमंत्र्यांनी उत्पन्नाचे दाखले, आणि डोमासाईल सर्टिफिकेट देण्याची अट शिथिल केली. केशरी रेशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ घेता येईल, असा निर्णय घेतला. मग राज्यातील अनेक बडे शेतकरी, उद्योगपती यांचीही चांदी झाली. या घरातील महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येत असल्यामुळे, या वर्गात आनंदाचे वातावरण पसरले. आता पुन्हा अडचण आली ती, चारचाकी वाहनधारकांची. आता या योजनेसाठी चारचाकी वाहन ही अट रद्द करण्याची मागणी होऊ लागली आहे. ना. अजित पवार यांनी जाहीर केलेली माझी लाडकी बहिण दिवसेंदिवस अधिकच लाडकी होत असल्याचा अनुभव येऊ लागला आहे.
कोणतीही योजना राबवताना, ती योजना रास्त लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असते. या योजनेत
राज्यातील किती महिलांचा अंतर्भाव होणार , याची आकडेवारी ही सरकारकडे असणे गरजेचे असते. योजनेसाठी दिला जाणारा पैसा राज्याच्या तिजोरीतून
दिला जातो. याचे भान मुख्यमंत्री आणि सरकारमधील मंत्र्यांना असणे आवश्यक असते. आता या लाडक्या बहिणीच्या वरचेवर वाढत चाललेल्या मागण्या, सरकार मान्य करू लागले तर, या योजनेच्या भवितव्याबाबत शंका उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही. ही योजना आणखी विस्तारत गेल्यास, नक्कीच बासणात गुंडाळली जाणार यात कोणतीही शंका नाही.