
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर शहरात होणाऱ्या आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर,पंढरीत अतिक्रमण हटाव मोहिमेने जोर धरला आहे. पंढरपूर नगरपरिषद प्रशासन याच बरोबर महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने
अतिक्रमण हटवण्याचा विडा उचलला आहे. पंढरीत येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी शहरातील अतिक्रमणे हटवण्यात यावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली होती. यानुसार पंढरीतील प्रशासन कामाला लागले आहे.
गुरुवार दिनांक ४ जुलै रोजी सर्व प्रशासनांनी मिळून अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली. येथील अहिल्या चौकातील अतिक्रमणे हटवण्यात आली. प्रदक्षिणा मार्ग आणि स्टेशन रोड परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात येणार असल्याची माहिती, संपूर्ण शहरात पसरली.
शहरातील अतिक्रमणे काढताना दोन दूजेपणा केला जात असल्याची चर्चा येथील व्यापारी वर्गातून होत आहे.
या मोहिमेत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव, प्रांताधिकारी सचिन इथापे, पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके आदी अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला असून,
प्रशासनाने मनात आणल्यास काहीही होऊ शकते, याची चुणूक गुरुवारी दिसून आली आहे.
पंढरपूर शहरात अनेक मोठे रोड आहेत. पदपथावरून
नागरिकांना चालत जाण्याची सोय आहे. परंतु या ठिकाणी अनेक छोट्या मोठ्या दुकानदारांनी आपली दुकाने थाटली आहेत. पंढरपूर नगरपरिषद प्रशासनाने याकडे कायमच दुर्लक्ष केले आहे. राजकीय लोकांच्या जवळचे हे व्यापारी, एक वर्ष त्याचं ठिकाणी दुकाने चालवत आहेत. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही अतिक्रमणे काढण्यात येत असली तरीही, पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमणे होणार नाहीत, हे कोणालाही सांगता येणार नाही. अतिक्रमणे काढल्यानंतर नगरपरिषद प्रशासनाकडून पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमणे करू नये असे सांगण्यात येत आहे.
पंढरपूर शहरातील स्टेशन रोडवर असंख्य दुचाकी कायमच उभारलेल्या असतात. या ठिकाणी असणाऱ्या बँकांमुळे ही वाहने त्याठिकाणी उभा असतात. नगरपरिषद प्रशासनाने याकडे कधीही गांभीर्याने पाहिले नाही. पंढरपूर शहरात बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलांना पार्किंगची सोय नाही, तरीही नगरपरिषद प्रशासनाने त्यांच्यावर मोठी मर्जी केली आहे. आता आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण काढताना, नागरिकांचा रोष पत्करावा लागत आहे.