
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर शहरात मोठे मोठे बाह्यवळण मार्ग आहेत. या मार्गावरील चौका -चौकात गतिरोधक बनवून सूचना फलक लावावेत, आणि अपघात टाळावेत अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेनेकडून करण्यात आली असून, याबाबतचे निवेदन येथील सार्वजनिक बांधकाम विभागास देण्यात आले आहे.
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे जाणा – येणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी असते. यामुळे पंढरपूर शहरात बाह्यवळण मार्ग बनवण्यात आले आहेत. परंतु या मार्गावर कोठेही गतिरोधक नाहीत, याशिवाय सूचना फलक लावण्यात आले नसल्याने, वाहन चालकांची मोठी तारांबळ उडते. यातच अनेक अपघात आजवर घडले आहेत.
येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौक, प्रबोधनकार ठाकरे चौक, अहिल्या चौक, कासेगाव फाटा, पंत चौक आदी ठिकाणी गतिरोधक लावण्यात यावेत, याशिवाय या ठिकाणी सूचना फलक नसल्याने बाह्यवळण मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचे वारंवार अपघात घडत आहेत, कित्येक माणसांना आजपर्यंत आपला जीव गमवावा लागला आहे, तर कित्येकांना कायमचे अपंगत्व आले आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत चालली आहे. या बाह्यवळण मार्गावरील चौकाचौकात सूचना फलक आणि गतिरोधक असणे गरजेचे असल्याचे मत येथील उद्धव ठाकरे शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आले आहे.
पंढरपूर शहरातील अंतर्गत रस्त्यावरून बाह्यवळण मार्गाला जोडणाऱ्या, प्रत्येक चौकात गतिरोधक आणि सूचनाफलक लावल्यास, याचा अपघातांवर मोठा परिणाम होऊन, अनेक नागरिकांचे जीव वाचणार आहेत, तरी या मार्गावर त्वरित गतिरोधक आणि सूचनाफलक उभे करावेत, अन्यथा बांधकाम प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बोंबाबोंब आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख बंडू घोडके यांनी संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे यांच्या आदेशाने लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुरांडे, इंद्रजीत गोरे, संजय घोडके, नागेश रीतुंड, अर्जुन भोसfले, उत्तम कराळे, संगीताताई पवार, अनिताताई आसबे, संजय पवार, कल्याण कदम, बाबासाहेब पाटील, मोहम्मद पठाण ,जालिंदर शिंदे, आदित्य घोडके, आकाश माने ,नामदेव चव्हाण, विजय बागल, नागेश जाधव ,महावीर हाके, बळीराम देवकते, अजित पवार, हर्षवर्धन जाधव यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.