
पंढरपूर (प्रतिनिधी)
आषाढी यात्रेनिमित्त पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी, भाविक येतात. या भाविकांच्या आरोग्य तपासणीसाठी आरोग्य विभागाच्या वतीने, मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या संकल्पनेवर आधारित, वारी कालावधीत प्रत्येक भाविकाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स यांच्यासह परराज्यातून वैद्यकीय पथके मागवण्यात येणार आहेत. तसेच पालखी सोहळा प्रस्थानापासून, वारकरी भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी आरोग्य यंत्रणा कार्यरत राहणार असल्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.
आषाढी यात्रा कालावधीत मोफत आरोग्य शिबिर आयोजनाबाबत पंढरपूर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, राज्य आरोग्य शिक्षणचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निंबकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, व वैद्यकीय अधीक्षक महेश सुडके यांच्यासह, राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.
यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले की, आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना तात्काळ व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे वाखरी व तीन रस्ता येथे महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. तसेच गोपाळपूर व ६५ एकर येथे ५० खटांचे तात्पुरते सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या शिबिरात सुसज्ज आरोग्य यंत्रणेसह, तज्ञ डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करण्यात येणार असून, भाविकांची आरोग्य तपासणी करून तात्काळ उपचार करण्यात येणार आहेत. पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी आरोग्य विभागाकडून मुबलक औषध पुरवठा, पिण्याच्या पाण्याचे नमुने, तपासणी करण्यात येणार आहे. पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या दिंड्यांना सामाजिक संस्था आणि व्यक्ती यांच्याकडून दिंड्यातील वारकरी व भाविकांना अन्नदान व फळ वाटप केले जाते. वाटप करण्यात येणाऱ्या अन्नाची व फळांची तपासणी करावी, असेही त्यांनी सांगितले.
पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या दिंड्यांच्या प्रत्येक मार्गावर आरोग्य विभागाचे सर्व दवाखाने व खाजगी हॉस्पिटल २४ तास सुरू राहतील, याची दक्षता घ्यावी. वारी कालावधीत महावितरण विभागाने जादा रोहित्रांची सुविधा व मुबलक मनुष्यबळाची व्यवस्था ठेवावी. शहरातील विजप्रवाह करणाऱ्या तारा झाडाझुडपांच्या फांद्यात अडकल्या असतील तर, त्या फांद्या तात्काळ काढून घ्याव्यात. नदीपात्रात नळ कनेक्शनची संख्या वाढवावी. स्वच्छतेसाठी जादाच्या कर्मचाऱ्यांची उपलब्धता ठेवावी. वाळवंटात कचरा साठवण्यासाठी पत्र्याच्या पानांचे १०० ते २०० मीटरला तात्पुरत्या कचरा कुंड्या कराव्यात, जेणेकरून मोठ्या प्रमाणात कचरा साठवता येईल. वाळवंटात बाईक ॲम्बुलन्सची उपलब्धता ठेवावी ,जेणेकरून भाविकांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध होईल. पोलीस प्रशासनाने वारी वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील, याची दक्षता घ्यावी. नगरपालिका विभागाने आरोग्य शिबिराच्या ठिकाणी स्वच्छता व पाण्याचा पुरवठा, अग्निशमन व्यवस्था उपलब्ध ठेवावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने शिबिराच्या ठिकाणी मुरमीकरण करावे, पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना कराव्यात. प्रशासनातील सर्वच विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.