
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर शहराची लोकसंख्या, शहरात येणाऱ्या भाविकांची दररोजची संख्या लक्षात घेता. नागरिकांना व भाविकांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी, जागेवरच उपचार मिळावेत म्हणून उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे १०० खाटांच्या रुग्णालयाचे २०० खाटांच्या रुग्णालयात विस्तारिकरण करण्यात येत आहे. यामुळे येथे उपचाराकरीता येणार्या रुग्णांची, भाविकांची आरोग्य सेवा करण्याची संधी मिळत आहे. आरोग्य विभागाने कोरोना काळात चांगले काम केले आहे. चांगल्या कामाची देशासह संपुर्ण जगाने दखल घेतली आहे. आरोग्य विभागाने माता सुरक्षा, घर सुरक्षा अभियान, सुदृढ बालक अभियान, आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे, हे उपक्रम यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे येत्या काळातही आरोग्य विभाग देशाच्या विकासात भरीव योगदान देण्यास सज्ज असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.
पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाच्या १०० वरून २०० बेड विस्तारीकरण कामाचे आज सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, राज्य आरोग्य शिक्षणचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले व वैद्यकीय अधिक्षक महेश सुडके, जिल्हा शल्यचित्सक कार्यालयाचे डॉ. श्रीकांत कुलकर्णी, प्रा.शिवाजी सावंत तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले, उपजिल्हा रुगणालय येथे १०० बेडच्या ठिकाणी २०० बेडचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. याकरीता १३ कोटी ७० लाख रुपये निधी खर्च केला जाणार आहे. हे काम दिड वर्षात पुर्ण केले जाणार आहे. येथे बेडची संख्या वाढल्यावर रुग्णांना उपचार करणे सोपे जाणार आहे. आरोग्य विभागातील समावेशन, भरती, बदली प्रक्रिया उपक्रम पारदर्शीपणे राबवला आहे. आरोग्य विभागाने माता सुरक्षा घर सुरक्षा अभियान राबवत ४ कोटी ९२ लाख मातांचे सर्वेक्षण केले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर सुदृढ बालक अभियान राबवत ० ते ६, ६ ते ११, ११ ते १८ वर्ष वयोगटातील बालकांचा सर्व्हे करुन, त्यांच्यावर आरोग्याच्या दृष्टिने उपचार करण्यात येत आहेत. तर आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे हे अभियान प्रत्येक शहरात राबवले. प्रत्येक १८ वर्षावरील तरुण ते आजोबापर्यंत तसेच युवती ते आजीपर्यंत जवळपास पावणे चार कोटी नागरिकांची तपासणी केली. आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे यामुळे बहुतांश तरुणांमध्ये बदल झाल्याचे चित्र दिसून येत आहेत. हे आरोग्य विभागाचे यशच म्हणावे लागेल.
रुग्णालयामध्ये मोफत उपचार सुरु केले. त्यामुळे ओपीडी, आयपीडी ची संख्या वाढली. औषध धोरण राबवले. यामुळे रुग्णालयाकडे येणाऱ्या नागरिकांची संख्या निश्चितपणे वाढली आहे. आरोग्याची वारी पंढरीच्या दारी यामाध्यमातूनही आरोग्य विभागाचे काम चांगले आहे. राज्यात राईट टू हेल्थ, ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. येत्या अधिवेशनात हा विषय मांडला जाणार आहे. आरोग्य विभाग भरीव योगदान देत असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगीतले.