मुंबई : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मोनू कल्याणे असे मृत नेत्याचे नाव आहे. इंदूरच्या एमजी रोड, पोलीस स्टेशन परिसरात ही हत्या करण्यात आली. मोनू कल्याणे हे मध्यप्रदेश मधील भाजपचे दिग्गज नेते आणि मंत्री कैलास विजयवर्गीय यांचे निकटवर्तीय होते. या घटनेमुळे इंदूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे मोनू कल्याणेवर गोळ्या झाडण्यात आल्या.
मोनूला त्याच्या मित्रांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिमणभाग परिसरात ही हत्या झाली असून, जुन्या वैमनस्यातून हा प्रकार घडला आहे. पियुष आणि अर्जुन नावाच्या आरोपींनी कल्याणेवर गोळ्या झाडल्या आणि लागलीच फरार झाले. दोन्ही आरोपींच्या घरांची पोलिसांनी झडती घेतली असून, या आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच मंत्री कैलास विजयवर्गीय आणि त्यांचा मुलगा आकाश विजयवर्गीय यांनी मोनूच्या कुटुंबाला धीर दिला. या परिसरात तणावपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांची कुमक तैण्यात करण्यात आली आहे.