पंढरपूर (प्रतिनिधी)
राज्यात गाजत असलेल्या नीट परीक्षा घोटाळ्यात
सोलापूरचे कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषदेचा शिक्षक संजय जाधव याचा थेट दिल्लीशी संबंध असल्याचे लातूर पोलिसांच्या निदर्शनास आले, आणि त्यांनी संजय जाधव यास संशयित म्हणून अटक केली आहे.
शिक्षक जाधव हा माढा तालुक्यातील टाकळी(टेंभुर्णी) या शाळेत नोकरीस होता. पत्नी मनोरुग्ण असल्याचे दाखवून त्याने अक्कलकोट तालुक्यात बदलीसाठी अर्ज केला होता. एक वर्षानंतर त्याने पत्नीचे मनोरुग्ण असल्याचे प्रमाणपत्र आणले होते.
या प्रकरणात सोलापूर जिल्हा परिषदेचे नाव पुढे आल्यामुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी त्याची चौकशी करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांना दिले होते. यानुसार शेख यांनी सूत्रे हलवली होती. माढ्याचे गटशिक्षणाधिकारी विकास जाधव, विस्तार अधिकारी शोभा लोंढे, केंद्रप्रमुख फिरोज मनेरी या तिघांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. मंगळवार दि.२५ जून रोजी या समितीने टाकळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, तसेच शालेय शिक्षण समिती, यांच्याशी सखोल चौकशी केली. १२ जून पासून तो विनापरवानगी गैरहजर असल्याचे आढळून आले. त्याचे कपाट सील करण्यात आले आहे. बदलीसाठी त्याने पत्नीचे मनोरुग्ण असल्याचे प्रमाणपत्र बुलढाणा येथून मिळवल्याचे दिसून आले आहे.