साडेसहाशे विद्यार्थ्यांना वाटल्या चार हजार वह्या
पंढरपूर तालुक्यातील तुंगत मधील डॉक्टर दाम्पत्याचा उपक्रम

पंढरपूर (प्रतिनिधी)
शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याकामी कोणतीही अडचण येऊ नये, याकरिता पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील डॉक्टर दांपत्याने अनोखा उपक्रम राबवला असून, हा उपक्रम गावोगावी राबवला जावा, अशी अपेक्षा शिक्षक वर्गाकडून व्यक्त होऊ लागली आहे.
तुंगत येथील सरपंच डॉ. अमृता रणदिवे आणि त्यांचे पती डॉ. आबासाहेब रणदिवे यांनी स्वखर्चातून हा उपक्रम राबवला असून, या उपक्रमाचे तुंगत परिसरात कौतुक होत आहे. तुंगत येथील अंगणवाडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, या दोन्ही शाळांमध्ये सुमारे ६५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागात अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असते, शाळा सुरू होताच
पालक खर्चाने बेजार होतात. यात काही विद्यार्थ्यांचे नुकसानही होते. हे नुकसान टाळण्यासाठी तसेच, आर्थिक परिस्थिती हालाखीची असणाऱ्या पालकांना हातभार लागावा, याच विचारातून डॉ. रणदिवे दांपत्याने स्वखर्चातून वह्या वाटपाचा निर्णय घेतला. आणि या ६५० विद्यार्थ्यांना तब्बल ४ हजार वह्यांचे वाटप केले.
डॉक्टर रणदिवे दांपत्य दरवर्षीच शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत असतात.यामध्ये शालेय साहित्य, सायकल वाटप, वृक्षारोपण, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या खाजगी क्लासेसची फी स्वतः भरण्याचा उपक्रम राबविला आहे. यावर्षी त्यांनी स्वखर्चातून वह्या वाटपाचा उपक्रम राबवला असून, या उपक्रमाचे कौतुक तुंगत परिसरातून होत आहे.
या वह्या वाटप कार्यक्रमप्रसंगी तुंगतचे उपसरपंच प्रकाश रणदिवे, सदस्य पंकज लामकाने सुधीर आंध, नारायण रणदिवे, नवनाथ रणदिवे, शिवाजी इंगळे, विठ्ठल कारखान्याचे संचालक विठ्ठल रणदिवे, कॅप्टन इंद्रजीत रणदिवे, धनाजी मोरे, विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक महादेव देठे,शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष वामन वनसाळे, फैयाज मुलानी, सचिन डिकरे, ज्योती बनसोडे आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.