
पंढरपूर (प्रतिनिधी)
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची आषाढी यात्रा,
लवकरच सुरू होत आहे. आषाढी एकादशी सोहळा
१७ जुलै रोजी आहे. या दिवशी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची महापूजा करणार आहेत. या आषाढी दौऱ्यात त्यांच्या हातून, पंढरीत अनेक विकास कामांची उद्घाटने होणार आहेत. याचवेळी त्यांची वाखरी ते पंढरपूर पायी वारी, वारकरी भाविकांसाठी चर्चेचा विषय ठरणार आहे.
राज्यात महायुतीचे सरकार आहे. दोन ते तीन महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मांडलेला अर्थसंकल्पही बरेच काही बोलून गेला. आता पंढरीतील आषाढी यात्रा
याचमुळे चर्चेत येणार आहे. या यात्रेत १५ लाखाहून अधिक भाविक पंढरीत येण्याची शक्यता आहे. राज्यातील या वारकरी भाविकांना आकर्षित करण्याची तयारी महायुतीसह, महाविकास आघाडीनेही केल्याचे दिसत आहे.
राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हे महायुतीचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा होणार आहे. पालखी सोहळ्याबरोबर वाखरी ते पंढरपूर पायी वारी करण्याचा निर्णय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
मागील वर्षी आषाढीपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरला येऊन, येथील तयारीची पाहणी केली होती. परंतु यावर्षी ते १६ आणि १७ जुलै रोजी पंढरपूरमध्ये असणार आहेत. या आषाढी दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून अनेक विकास कामांच्या उद्घाटनांचा धमाका पहावयास मिळणार आहे.
पंढरपूर शहरात मंजूर झालेल्या ५ कोटी रुपयांच्या राज्यातील पहिल्या मराठा भवन इमारतीचे भूमिपूजन, याशिवाय २६ कोटी रुपये खर्चून पंढरपूरमध्ये
होउ घातलेल्या प्रशासकीय भवनचे भूमिपूजन, तसेच पंढरीत साकारलेल्या चंद्रभागा बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.
*यावर्षी प्रशासकीय अधिकारी निर्धास्त*
मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यात्रेपूर्वीच पंढरीत येऊन, येथील परिस्थितीची पाहणी केली होती. भाविकांची विचारपूस करून, प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. परंतु सध्या निवडणुकीचा काळ आहे. दोन ते तीन महिन्यावर निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोणालाही दुखावणे, कोणत्याही राजकारण्यास शक्य नाही. यामुळे मागील वर्षी धसका घेतलेले प्रशासकीय अधिकारी,
यावर्षी मात्र निश्चिंत असल्याचे दिसत आहे.