
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर तालुक्यात एमआयडीसी ची निर्मिती व्हावी , यासाठी आजपर्यंत दिवंगत आमदार भारत भालके,
आ. बबनदादा शिंदे तसेच पंढरपूर मंगळवेढ्याचे आ.
समाधान अवताडे यांनी मोठा पाठपुरावा केला आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे या एमआयडीसीची निर्मिती व्हावी, यासाठी आ. अवताडे हे आजपर्यंत प्रयत्नशील राहिले आहेत. परंतु या प्रश्नात दखल देत, खा. धैर्यशील मोहिते पाटील आणि आ. रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी आ. बबन दादा शिंदे आणि आ. समाधान अवताडे यांना धोबीपछाड केल्याचे दिसत आहे.
आ. समाधान आवताडे यांनी मागील काही दिवसांपूर्वी, ना. उदय सामंत यांच्याबरोबर बैठक लावून , पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे एमआयडीसीची निर्मिती
करण्यास अनुमती मिळवली होती. यानंतर काही दिवसांनी महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कासेगाव येथील शासकीय जागेची पाहणी केली होती. आता हा प्रश्न सुटतो की काय , अशी परिस्थिती निर्माण झाली असताना, मोहिते पाटील बंधूंनी राजकीय धुळवड उडवून दिली आहे.
माढा विधानसभा मतदारसंघातील मेंढापूर येथील शासकीय जमिनीत एमआयडीसीची निर्मिती व्हावी , यासाठी त्यांनी ना. उदय सामंत यांच्याबरोबर बैठक लावली होती. यानंतर अवघ्या काही दिवसातच महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मेंढापूर येथे येऊन येथील शासकीय जागेची पाहणी केली आहे. मेंढापूर मध्ये एमआयडीसीची निर्मिती झाल्यास, आ. बबनदादा शिंदे आणि मंगळवेढ्याचे आ. समाधान अवताडे यांच्यासाठीही मोठी अडचणीची ठरणार आहे.
आ. बबनदादा शिंदे यांनी टेंभुर्णी येथे एमआयडीसी ची उभारणी केली आहे. याच मतदारसंघात मेंढापूर येथे मोहिते पाटील बंधूंच्या पुढाकाराने एमआयडीसी ची निर्मिती झाल्यास शिंदे यांच्यापुढे मोठा राजकीय पेच उभा राहणार आहे. माढा तालुक्यातील त्यांच्या वर्चस्वास हा मोठा हादरा असणार आहे.
पंढरपूर तालुक्यात एमआयडीसीची निर्मिती
करण्यासाठी आ. समाधान अवताडे यांनीही मोठे शर्तीचे प्रयत्न केले होते. परंतु ,कासेगाव येथून मेंढापूर येथे ही एमआयडीसी निर्माण झाल्यास , याचा फटका आ. अवताडे यांनाही बसणार आहे.