सामाजिक

सरकोलीत आढळली बोगस ई सेवा केंद्रे

ही केंद्रे बंद करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

  • पंढरपूर  (प्रतिनिधी)

पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे तब्बल ११
आपलं सरकार सेवा केंद्रांची अधिकृत नोंदणी असल्याचे आढळून आले असून, सरकोलीतील ग्रामस्थांना मात्र याचा थांगपत्ताही नाही, सरकोली गावाच्या उपयोगी न पडणारी ही ई सेवा केंद्रे तात्काळ बंद करण्यात यावीत, अशी मागणी येथील सोसायटीचे चेअरमन हनुमंत भोसले यांच्याकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे दिले असून, याबाबतच्या चर्चेने पंढरपूर तालुक्यात खळबळ उडवून दिली आहे.

पंढरपूर तालुक्यातील महसूल विभाग या ना त्या कारणाने सततच चर्चेत असतो. येथील वाळू तस्करी, मुरूम तस्करी,अवैध खडी क्रेशर कायमच चर्चेत असतात.यात आता तालुक्यातील अवैध ई सेवा केंद्रांची भर पडली आहे. पंढरपूर तालुक्यात अनेक सेवा केंद्रे ठरवून दिलेल्या जागी काम न करता, आपली मर्यादा ओलांडत असल्याची प्रकरणे याआधीही उघड झाली आहेत. आता पुन्हा यात नव्याने सरकोली गावातील बोगस सेवा केंद्रांची भर पडली आहे.

सरकोली गावात ११ ई सेवा केंद्रे असल्याची माहिती येथील एका नागरिकाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनच मिळाली. हे ऐकून गावातील नागरिकांना धक्काच बसला. ही ई सेवा केंद्रे आजतागायत कधीही गावात दिसली नाहीत, ती
बोगस ई सेवा केंद्रे बंद करण्यात यावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होऊ लागली. येथील सोसायटीचे चेअरमन हनुमंत भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवली आहे. या मागणीमुळे येथील महसूल प्रशासन नक्कीच अडचणीत येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

पंढरपूर तालुक्यात असंख्य माजी ई सेवा केंद्रे कार्यरत आहेत. नागरिकांची विविध कामे या केंद्रांमार्फत होत असतात. परंतु अनाधिकृत ई सेवा केंद्रांची संख्या मोठी असून, हीच केंद्रे महसूल विभागातील भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचे दिसून आले आहे. याबाबतची ओरड नेहमीच होताना दिसते, परंतु महसूल विभागाकडून याबाबत कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.

बोगस ई सेवा केंद्रांचे पाठीराखे कोण ?

कोणतीही बोगस संस्था चालवण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांचा वरदहस्त लागतो. असाच वरदहस्त या ११ ई सेवा केंद्र चालकांवर असल्याचे निष्पन्न झाले आहे. ई सेवा केंद्र चालकांचा येथील प्रशासकीय बाबुंशी थेट संपर्क असल्याचे आढळून आले आहे.
यापैकी काही केंद्र चालक ग्रामसेवक तलाठी यांचे खाजगी क्लाइंट असल्याची माहिती मिळाली असून, ही बोगस ई सेवा केंद्रे येथील महसूल प्रशासनाचीच
अपत्ये तर नाहीत ना ? अशी चर्चा सबंध पंढरपूर तालुक्यात होऊ लागली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close