कोलकत्यातील घटनेच्या निषेधार्थ पंढरीत डॉक्टरांचा बंद
शनिवारी दिवसभर ओपीडी सह विविध विभागांच्या सेवा बंद

पंढरपूर (प्रतिनिधी)
कोलकत्यातील आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पंढरपूरमधील डॉक्टर संघटना एकवटली असून, या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी शनिवारी दिवसभर बंद पाळण्यात येत आहे. पंढरपूर आयएमए संघटनेने हे पाऊल उचलले असून, रुग्णालयांना सेफ झोन घोषित करण्याची मागणी वैद्यकीय क्षेत्रातून होत आहे.
कोलकत्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला असून, देशभरातून संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर देशभरात डॉक्टरांचे मोठे आंदोलन देखील झाले होते. आता या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन वतीने शनिवार १७ ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारला आहे.
पंढरपूर आयएमएकडून रुग्णालयांना सेफ झोन घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या देशव्यापी आंदोलनाचा देशातील वैद्यकीय सेवेवर मोठा परिणाम दिसून येणार आहे. तसेच आता डॉक्टरांकडून देशभरात आंदोलन तीव्र करत १७ ऑगस्ट रोजी बंद पुकारण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा १७ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते १८ ऑगस्ट सकाळी ६ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, अतिआवश्यक सेवा सुरु राहणार आहेत. याशिवाय, आयसीयू, अपघात विभाग आणि प्रसूती विभागही सुरु ठेवणार असल्याचे आयएमएने आपल्या पत्रकात स्पष्ट केले आहे. तब्बल २४ तास इतर सेवा बंद राहणार आहे.