
पंढरपूर (प्रतिनिधी)
राज्यात दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार वाढतच आहेत. यामुळेच बदलापूर सारख्या अनेक घटना राज्यात घडत आहेत. राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. यास राज्यातील महायुती सरकारच जबाबदार आहे. या घटनांचा निषेध पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटी कडून नोंदवण्यात आला. सरकारचा निषेध नोंदवून काँग्रेसकडून अनेक मागण्या मांडण्यात आल्या.
महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. परंतु उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे हा बंद मागे घेण्यात आला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ठिकठिकाणी महायुती सरकारचा निषेध नोंदवण्यात येत आहे.
पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंत मोरे यांनी याबाबतचे निवेदन, करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांच्याकडे सुपूर्द केले .यानुसार बदलापूर, कलकत्ता ,कोल्हापूर ,अकोला येथील बलात्कार व अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, पीडित व त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात यावे ,सदरच्या शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी , महिलांसाठी सुरक्षित बहिण योजना राबवून, त्यासाठीची कार्यप्रणाली आखण्यात यावी, शाळा परिसर, शिक्षक स्टाफ, तसेच मुख्याध्यापक यांच्या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, राज्यातील बेपत्ता मुलींच्या शोधासाठी विशेष पथक नेमण्यात यावे, तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा पथक नेमण्यात यावे, अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आले आहेत.