राष्ट्रीय महामार्गावरील नारायण चिंचोली येथील कामे खोळांबली
ग्रामस्थांनी दिला रास्ता रोकोचा इशारा

पंढरपूर (प्रतिनिधी)
मोहोळ आळंदी पालखी मार्गाचे काम पूर्ण झाले. या महामार्गावरून वाहने भरधाव वेगाने वाहू लागली. परंतु नारायण चिंचोली गावाजवळ अनेक कामे अपूरीच राहिली. येथील उड्डाण पुलाला गळती लागली. तर या गावाजवळ पथदिव्यांची सोय झाली नाही. परिणामी अपघाताचे प्रमाण वाढले. आजपर्यंत झालेल्या अपघातात चार ते पाच जणांना प्राण गमवावे लागले, यामुळे येथील ग्रामस्थ भयभीत आणि संतप्त झाले. परिणामी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला रस्ता रोकोचा इशारा दिला. येत्या बुधवारी या ठिकाणी रस्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती, सरपंच नर्मदा लक्ष्मण धनवडे यांनी दिली आहे.
मोहोळ आळंदी राष्ट्रीय महामार्गावर पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली हे गाव आहे. या गावाजवळ उड्डाणपूलही उभारण्यात आला आहे.
परंतु महामार्गाला आवश्यक असणाऱ्या सुविधा मात्र पुरवण्यात आल्या नाहीत. महामार्गाच्या बाजूने ड्रेनेजचे काम केले नसल्यामुळे, सांडपाणी गावातूनच वाहत आहे.
उड्डाण पुलाला गळती लागली आहे. याशिवाय या महामार्गावर नारायण चिंचोली गावाजवळ पथदिव्यांची सोय नसल्यामुळे, आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत. या अपघातात चार ते पाच जणांना प्राण गमवावे लागले आहेत.
याबाबत मे महिन्यात ग्रामस्थांकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना इशारा देण्यात आला होता. यावेळी या अधिकाऱ्यांनी चार ते पाच दिवसाची मुदत मागितली होती. परंतु आजपर्यंत चार ते पाच महिने उलटले, या अधिकाऱ्यांनी यातील कोणतीही सोय उपलब्ध करून दिली नाही. याचवेळी येथील बस स्थानकावर छप्पर नसल्याने नागरिकांना उन्हात आणि पावसात उभा राहावे लागत आहे, याचा निषेध नारायण चिंचोली ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत १८ जून रोजी या ठिकाणी रस्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत नारायण चिंचोलीचे सरपंच नर्मदा लक्ष्मण धनवडे तसेच उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण यांनी याबाबतचे निवेदन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास दिले आहे. बुधवार दि. १८ जून रोजी सकाळी १० वाजता हा रस्ता रोको करण्यात येईल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.