सामाजिक

बुद्ध विहारच्या निर्मितीस पंढरपूर नगरपरिषदेचा खोडा

सम्यक क्रांती मंचचे पदाधिकारी करणार आजपासून आमरण उपोषण

पंढरपूर (प्रतिनिधी)

तीर्थक्षेत्र पंढरीत अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या बुद्ध विहारच्या निर्मितीत अडथळा आला आहे. या वास्तूसाठी पंढरपूरमधील यमाई तलावाकाठची दहा एकर जागेची मागणी सम्यक क्रांती मंचकडून, पंढरपूर नगरपरिषदेकडे करण्यात आली होती. सन २०१२ साली याबाबत ठरावही पंढरपूर नगरपरिषदेमध्ये करण्यात आला होता. परंतु अचानक येथील चार एकर जागेवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी गृहप्रकल्प राबविण्याचे पंढरपूर नगरपरिषदेने ठरवले आहे. यामुळे येथील बुद्धविहार निर्मितीचा मार्ग खुंटला आहे. पंढरपूर नगरपरिषदेकडून करण्यात आलेल्या या खोडसाळपणा विरोधात सम्यक क्रांती मंचचे कार्यकर्ते आजपासून आमरण उपोषण करणार आहेत.

पंढरपूर शहराच्या सौंदर्यात यमाई तलावाने मोठी भर घातली आहे. या तलावाकाठी एकूण साडेआठ एकर जागा अस्तित्वात आहे. या बुद्धविहारच्या निर्मितीसाठी ही जागा योग्य होती. बुद्ध विहारच्या या जागेस आजवर मंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक
मंत्र्यांनी भेट दिली होती. असे असताना अचानक
यापैकी चार एकर जागेवर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी गृहनिर्माण प्रकल्प राबवण्याचे धोरण पंढरपूर नगरपरिषदेने आखले आहे.

वास्तविक पाहता ही जागा बुद्धविहारच्या निर्मितीस अनुकूल होती. शांत आणि नयनरम्य परिसरात बुद्ध विहारची निर्मिती झाल्यास , पंढरपूरच्या अध्यात्मिक वैभवात भर पडणार होती. असे असताना पंढरपूर नगरपरिषदेतील मुख्याधिकारी तसेच
भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी
हा खोडसाळपणा केला असल्याची जाणीव सम्यक क्रांती मंचच्या कार्यकर्त्यांना झाली आहे. यामुळे पंढरपूर नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात हे कार्यकर्ते पंढरपूर नगरपरिषदेसमोर आजपासून हालगी नादात, आमरण उपोषण करणार असल्याची माहिती सम्यक क्रांती मंचने घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

या पत्रकार परिषदेस सम्यक क्रांती मंचचे
सिद्धार्थ जाधव, प्रशांत लोंढे, रवी शेवडे, स्वप्निल गायकवाड, कालिदास जाधव, दीपक वाघमारे, अक्षय सोनवणे, सज्जन गायकवाड, विठ्ठल पवार सनी पिंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close