माढा तालुक्यात आता बैलगाडी शर्यतीचा भडका
अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी बावी येथे थरार

पंढरपूर (प्रतिनिधी)
माढा विधानसभेची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवायचीच या उद्देशाने विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी चाल खेळण्यास सुरुवात केली आहे. आजवर कधीही अनुभवण्यास न मिळालेले कार्यक्रम माढा तालुक्यातील जनता पाहू लागली आहे. बावी येथे शनिवारी बैलगाडा शर्यतीचा भडका उडणार आहे. या भडक्याने दिग्गज राजकारण्यांच्या हृदयात मोठी धडकी भरणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त, ओपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैलगाडा शर्यतीत १ कोटी रुपये किमतीचा बैलही हजर होणार असून , माढा तालुक्यातील बावी येथे
शनिवारी बैलगाडा शर्यतीचा थरार माढा तालुक्यातील नागरिकांना अनुभवण्यास मिळणार आहे. दि. पाच ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीच्या मैदानाची पाहणी नुकतीच अभिजीत पाटील आणि विठ्ठल प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून करण्यात आली आहे.
ओपन बैलगाडा शर्यतीत भाग घेणाऱ्या बैलगाडा मालकांसाठी मोठी पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.प्रथम क्रमांकाचे पारितोषिक २ लाख ११ हजार १११ रुपये, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक १ लाख ५१ हजार १११ रुपये, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक १ लाख ११ हजार १११ रुपये, चौथे पारितोषिक ५१ हजार १११ रुपये, पाचवे पारितोषिक ४१ हजार १११ रुपये, सहावे पारितोषिक ३१ हजार १११ रुपये, सातवे पारितोषिक २१ हजार १११ रुपये, याप्रमाणे
पारितोषिके देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमानुसार आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी आदर्श बैलगाडा मालक उपस्थित राहणार असून, यामध्ये मोहितशेठ धुमाळ (सुसगाव), राहुलभाई पाटील (कल्याण), सुभाष तात्या मांगडे (नाना पेठ), धनाजी तात्या शिंदे (सैदापूर), प्रदीप नाना पाटील (कापूसखेड), सरपंच संतोष शेठ मोडक (वडकने) हे उपस्थित राहणार आहेत. या बैलगाडी शर्यतीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन अभिजीत पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी डीव्हीपी मल्टीस्टेटचे चेअरमन औदुंबर महाडिक देशमुख, स्वप्नील मोरे, विठ्ठल कारखान्याचे संचालक धनाजी खरात, शुभम मोरे , दयानंद महाडिक देशमुख, सतीश पडळकर, डी. एम. मोरे महाराज, सुरज मोरे, श्रीशैल मोरे, अमित मोरे, केदार मोरे, अजित मोरे, आदर्श मोरे, धर्मराज मोरे, विठ्ठल कारखान्याचे संचालक तुकाराम मस्के, नवनाथ नाईकनवरे , दत्तात्रय नरसाळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
माढा तालुक्यात मिळतेय
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी माढ्याच्या मैदानात उतरण्याचे ठरवले. आणि माढा तालुक्यास अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळाली. आजवर या तालुक्यात या स्वरूपाचे कार्यक्रम कधीही झाले नव्हते.
विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर अभिजीत पाटील यांनी हे रणांगण सजवले आहे. या रणांगणाची भीती आता भल्या भल्या राजकारण्यांच्या हृदयात धडकी भरवू लागली आहे.