
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर शहरातील आषाढी यात्रेसाठी मिळणारे अनुदान पाच कोटी रुपयांवरून दहा कोटी, आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या प्रत्येक दिंडीला आर्थिक मदत, पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि नागरिकांना पंचनामे करून तात्काळ मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच घेतला. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आदेशही देण्यात आले असल्याची माहिती, मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्याकडून देण्यात आली आहे.
शुक्रवारी मनसे नेते दिलीप धोत्रे, बाळा नांदगावकर, जयकुमार बाविस्कर यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथी गृहावर भेट घेतली. यावेळी पंढरपूरमधील आषाढी यात्रा आणि पंढरपूर मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी काही मागण्यांचे निवेदनही त्यांच्याकडे दिले. पंढरपूरला होणाऱ्या आषाढी यात्रेत भाविकांना सुख सुविधा पुरवण्यासाठी देण्यात येणारे अनुदान,पाच कोटी रुपयांवरून दहा कोटी रुपये इतके करण्यात यावे, पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात अतिवृष्टी झाली. यामुळे नागरिकांच्या घरात पाणी घुसले. संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांची पिके वाया गेली. या घटकांना त्वरित मदत करण्यात यावी अशी मागणी, निवेदनाद्वारे करण्यात आली होती. याचवेळी पंढरपूर शहरातील पंतप्रधान आवास योजनेतील घरांचे बांधकाम रखडले असल्याचे सांगण्यात आले होते. हे बांधकाम त्वरित सुरू करून, नागरिकांना त्यांची घरे देण्यात यावीत अशी मागणीही करण्यात आली होती.
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक निर्णय घेतला. आषाढी यात्रेसाठी देण्यात येणारे अनुदान पाच कोटी रुपयांवरून दहा कोटी रुपये करण्याचा आदेश दिला. पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांच्या घरांचे आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याचे आदेशित केले. याचवेळी
पंढरपूर शहरातील पंतप्रधान आवास योजनेतील घरे लवकरात लवकर लाभार्थ्यांना दिली जावीत, अशा सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.