
पंढरपूर (प्रतिनिधी)
विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. बुधवारपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. याआधीच ही निवडणूक संकटात असल्याची चाहूल लागली आहे. पैशाचे आमिष दाखवून आजकाल निवडणुका जिंकल्या जातात. यामुळे लोकशाही धोक्यात येते. नेमकी हीच गोष्ट पुढे आली आहे. पुणे बंगळूर महामार्गावर पाच कोटींचं घबाड घेऊन जाणारी चारचाकी पोलिसांच्या हाती लागली आहे. ही गाडी सांगोल्यातील असून, याचा संदर्भ आ. शहाजीबापू पाटील यांच्याकडे वळत आहे.
पंढरपूर बंगळूर महामार्गावर सापडलेली
नोटांनी भरलेली ही गाडी आ. शहाजीबापू पाटील
यांच्याशी निगडित असणाऱ्या नलावडे नामक
व्यक्तीची असून, यामध्ये पोलिसांनी अटक केलेले
चारही व्यक्ती त्यांच्याच संपर्कातील असल्याचे
बोलले जात आहे. परंतु यावर आ. शहाजीबापू पाटील यांनी आपले वक्तव्य केले आहे. ही गाडी सांगोल्यातील असल्यामुळे याचा संदर्भ माझ्याशी जोडला जात आहे. मी आमदार असल्यामुळे, तालुक्यातील सर्वच मंडळी माझ्या संपर्कात आहेत, असा खुलासा यांनी केला आहे.
पैसा कोणी दिला, आणि कुठे चालला होता. यास आजच्या घडीस कोणतेही महत्त्व नाही. परंतु पैसा
कोणत्या कामासाठी चालला होता ? यावर
पुढील सर्व काही ठरणार आहे. पोलीस प्रशासनाने नाकाबंदी दरम्यान खेड शिवापूर टोलनाक्यावर ही गाडी पकडली. या गाडीत १५ कोटी रुपये होते, हे पैसे सांगोल्याचे आ. शहाजीबापू पाटील यांच्याकडे जाणार होते, अशी टीका खा. संजय राऊत यांनी केली आहे. हे पैसे जर निवडणुकीसाठी जात असतील तर, लोकशाहीसाठी हे नक्कीच घातक आहे. अजून किती खोक्यांची तस्करी या निवडणूक काळात होणार ? असा प्रश्न सामान्य नागरिकांना भेडसावू लागला आहे.
*निवडणूक आयोगाची काय भूमिका राहणार*
हा पैसा कुठून कशासाठी चालला होता , ही गोष्ट पोलीस तपासात पुढे येणार आहे. हा पैसा जर
निवडणुकीसाठी जाणार होता, अशी माहिती पुढे आल्यास, निवडणूक आयोग याबाबत काय निर्णय घेणार ? याकडेही सामान्यजणांचे लक्ष लागून राहिले आहे.
*आ. शहाजीबापू पाटील संकटात*
आ. शहाजीबापू पाटील हे सांगोल्याचे आमदार असून, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत. पुणे महामार्गावर पाच कोटी रुपये घेऊन निघालेली गाडी, त्यांच्याकडेच निघाली होती, असा संशयी आरोप सध्या त्यांच्यावर केला जात आहे. शिवसेना फुटीच्या वेळी आ. शहाजीबापू पाटील यांच्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने पन्नास खोके एकदम ओके .. अशी टीका करायला सुरुवात केली होती. यामुळे शिवसेना शिंदे गट पुरता हैराण झाला होता आता ही पाच कोटीं घेऊन जाणारी गाडी त्यांच्याकडेच चालली होती, असा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून केला जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यावर हा आरोप होत असल्यामुळे, त्यांची निवडणूक धोक्यात येणार काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे