
पंढरपूर (प्रतिनिधी)
पुणे बंगळूर महामार्गावर पोलिसांना नाकाबंदी दरम्यान गाडीत पाच कोटींची रोकड सापडली.ही गाडी मुंबईतून निघून सांगोला येथे जाणार होती. या रोख रकमेसह चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यापैकी एकाचे नाव रफीक नदाफ आहे. हा सांगोल्यातील एक उत्तम व्यावसायिक असल्याचे आ. शहाजीबापू पाटील यांनी सांगितले आहे. परंतु याची दुसरी ओळख बापू. सांगायला विसरले वाटतं !
पुणे महामार्गावर सापडलेली ही रोकड सांगोला येथे जाणार होती, असे पोलिसांना गाडीतील इसमांकडून समजले, आणि याचा रोख आ.शहाजीबापू पाटील यांच्याकडे होता. पोलिसांनी या रोख रकमेबरोबर चार इसमांना ताब्यात घेतले आहे. यापैकी एकाच नाव रफीक नदाफ आहे. रफीक नदाफ हा उत्तम व्यवसायिक असल्याची माहिती आ. शहाजीबापू पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे. कोण हा रफीक ?
रफीक नदाफ याची माहिती घेतली असता ,
मोठ्या मजेदार गोष्टी पुढे येतात. शिवसेना फुटीच्या दरम्यान रफिक नदाफ आणि आ. शहाजीबापू पाटील यांच्यातील एक संभाषण व्हायरल झाले होते. या संभाषणामधून काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, एकदम ओके हाय … आ. शहाजीबापू पाटील यांचा डायलॉग होता. या डायलॉगलेच सबंध महाराष्ट्राला वेड लावले होते. हे संभाषण ठरवूनच व्हायरल करण्यात आले होते, असा अंदाज त्यावेळी अनेक मंडळींनी व्यक्त केला होता. हाच तो रफीक नदाफ या गाडीबरोबरील रोख रकमेसोबत सापडल्याने, आ. शहाजीबापू यांच्याकडे संशयाची सुई वळली आहे. यामुळेच शिवसेना उद्धव गटाचे खा. संजय राऊत यांनी आ. शहाजीबापू पाटील यांच्यावर घनघोर टीका केली आहे. ही रक्कम ५ कोटी रुपयांची नसून १५ कोटी रुपये होती. प्रत्येक आमदाराला ७५ कोटी रुपयांची मदत निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात येत असून, यापैकी हा पहिला हप्ता होता. असे त्यांनी म्हटले आहे. परंतु आ. शहाजीबापू पाटील यांनी याचे खंडन केले आहे. माझा विजय निश्चित आहे, कोणी कितीही कटकारस्थान करो, त्याचा काही परिणाम होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. परंतु काय बापू , हाच का तो रफीक ? हा प्रश्न नागरिकांच्या
जिभेवर नक्की येणार आहे ?
पोलीस प्रशासन या प्रकरणाची कसून चौकशी करणार आहे. या चौकशीत आ. शहाजीबापू पाटील यांना क्लीनचीट मिळेलही कदाचित, परंतु नागरिकांच्या मनात रफीक नदाफ आणि आ. शहाजीबापू पाटील यांचे संबंध कायम घर करून राहणार आहेत.