
पंढरपूर (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार, अनिल सावंत हे प्रचार कार्यास आजपासून सुरुवात करणार असून, त्यांच्या प्रचाराचा नारळ मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथील महादेव मंदिरात फुटणार आहे. खा. धैर्यशील मोहिते पाटील आणि राहुल शहा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाकडून पंढरपूर विधानसभा मतदारसंघात मोठी अनपेक्षित उमेदवारीची घोषणा झाली. अनिल सावंत यांच्या उमेदवारीच्या घोषणेने भल्या भल्या राजकारण्यांना हलवून सोडले. उमेदवारी अर्ज भरल्यापासूनच अनिल सावंत हे कामास लागले असून, त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवार दि. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता, माचणुर येथील महादेव मंदिरात नारळ फोडून होणार आहे. अनिल सावंत यांच्यासह खा. धैर्यशील मोहिते पाटील आणि राहुल शहा हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसचे तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील नागरिकांनी यावेळी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे पर्यायाने महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांनी केले आहे.