
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर तालुक्यात राजरोस सुरू असणाऱ्या वाळू तस्करीवरुन , येथील प्रांताधिकारी आणि तहसीलदारांवर कायमच खापर फोडले जाते.
पंढरपूर तालुक्यातील नागरिकांना येथील वाळू तस्करीची सवयच झाली आहे. येथील समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी, पंढरपूरमध्ये आलेल्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यापुढे वाळू तस्करीचे गाऱ्हाणे मांडले होते. यावर ना. सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा करून, येथील प्रांताधिकारी आणि तहसीलदारांवर कारवाई करण्याचे आश्वासन दोनच दिवसापूर्वी दिले होते.
ना. तानाजी सावंत हे त्यांच्या रोखठोक व्यक्तिमत्वाबाबत प्रसिद्ध आहेत. यामुळेच त्यांच्याबाबत नेहमी वाद उत्पन्न होतात. तरीही ते आपल्या निर्णयावर आणि वक्तव्यावर ठाम असतात.
त्यांच्या या स्वभावाचा फटका आपणास बसू नये, म्हणून येथील महसूल विभागातील अधिकारी
जागे झाल्याचे दिसत आहेत.
ना. सावंत यांनी समाजसेवक गणेश अंकुशराव यांना आश्वासन दिल्यानंतर, दोनच दिवसात येथील महसूल विभाग कामास लागला. चंद्रभागा नदीच्या पात्रातील दोन लाख रुपये किमतीचे ४ तराफे पूर्णपणे नष्ट करण्यात आले. तसेच शिरढोण येथील नदीपात्रालगत वाळूचोरी करत असताना, एक जेसीबी पकडून तो शासकीय गोदामात जमा करण्यात आला आहे. पंढरपूर येथील गाढवावरून वाळू चोरी करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध, चाप्टर केसची कारवाई प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती येथील तहसीलदार सचिन लंगुटे यांच्याकडून देण्यात आली आहे. ही कारवाई महसूलच्या भरारी पथकाने केली आहे.
पंढरपूर तालुक्यातील अनेक गावे भीमा नदीच्या काठावर आहेत. या गावातून बारमाही वाळू तस्करी केली जाते. येथील तलाठी आणि मंडळ अधिकारी याबाबत डोळेझाक करत असतात. ही डोळेझाक अर्थपूर्ण असल्याचे येथील सामान्य नागरिकांना देखील ठाऊक आहे.
मागील काही दिवसांपूर्वी चंद्रभागेच्या पात्रात अंघोळीसाठी गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. वाळू उपसा केल्यामुळे त्या ठिकाणी मोठा खड्डा पडला होता. या खड्ड्याचा अंदाज न आल्याने सचिन महेश अभंगराव या तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता. यावर मयत तरुणाच्या कुटुंबीयांनी तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय, अथवा त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय, अंत्यविधी न करण्याचा इशारा दिला होता. याचवेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन या कुटुंबास दिले होते.