
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूरमध्ये १७ जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा संपन्न होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महापूजेसाठी पंढरीत येत आहेत. राज्य सरकारने मंजूर केलेल्या मराठा भवन या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी याच दिवशी करावे, यासाठी मराठी समाज बांधवांकडून आमंत्रण देण्यात आले आहे. हे आमंत्रण मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले असल्याची माहिती, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी दिली आहे.
मागील कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस हे विठ्ठलाच्या महापूजेसाठी पंढरीत आले होते. यावेळी मराठा समाज बांधवांनी आंदोलन पुकारले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, मराठा समाजाच्या मागण्या ऐकून घेतल्या होत्या. त्या पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले होते. आता आषाढी एकादशीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा होत आहे. महापूजेला येण्याअगोदरच
त्यांनी मराठा भवन चा मुद्दा निकाली काढला आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा नियोजन मंडळातून , या इमारतीसाठी पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामुळे येथील समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पंढरपूर शहरात मराठा भवनसाठी जागेची तरतूदही झाली आहे. या जागेवर मराठा भवन या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच करावे. आषाढी एकादशी दिवशी ते पंढरपूरला येत आहे. याच दिवशी हा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पाडावा, अशी सूचना मराठा समाज बांधवांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात आली आहे. यावेळी मराठा भवन या इमारतीस भरीव निधीची तरतूद केल्यामुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानण्यात आले.