मंगळवेढा तालुक्यात खरीप हंगामासाठी तेरा कोटी रुपयांचा पिक विमा मंजूर
आ. समाधान अवताडे यांनी दिली माहिती

पंढरपूर (प्रतिनिधी)
मंगळवेढा तालुक्यामध्ये मागील वर्षी खरीप हंगामातील पिकांचे पिक विमे ,५१ हजार २७२ हे. क्षेत्रावर भरले होते. त्यातील ४७ हजार ८० शेतकऱ्यांना सुमारे १३ कोटी रुपये पिक विमा मंजूर झाला आहे. लवकरच त्यांच्या खात्यावर पिक विम्याची रक्कम वर्ग होणार असल्याची माहिती आ. समाधान अवताडे यांनी दिली आहे.
यामध्ये मध्ये प्रतिकूल परिस्थितीत बाजरी पिकासाठी, ११ हजार ५८ शेतकऱ्यांनी विमा भरला होता. त्यातील १० हजार १०६ शेतकऱ्यांना २ कोटी ५९ लाख रुपयांचा, विमा खात्यावर जमा झाला आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे खाते नंबर आधार कार्डशी संलग्न नसल्यामुळे, त्यांना केवायसी केल्यानंतरच हे पैसे मिळणार आहेत.
याचबरोबर वैयक्तिक कंपनीकडे तक्रार केल्यानंतर पंचनामे होऊन नैसर्गिक आपत्तीमधून कांदा, तूर, मका ,बाजरी या पिकांसाठी २५३१ शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार केली होती. त्या तक्रारदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी २ कोटी ८६ लाख रुपये मंजूर झाले आहेत. तेही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.
सी सी इ आधारित ३३ हजार ४९१ शेतकऱ्यांचाही पिक विमा मंजूर झाला असून, ७ कोटी ३१ लाख ७० हजार रुपये मंजूर असून, तेही लवकरच खात्यावर जमा होणार आहेत. याचबरोबर फळ पिक विमा योजनेच्या बाबतीतही पाठपुरावा सुरू आहे. यावर्षीही सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरवून घेणे गरजेचे आहे. शासनाने एक रुपयात विमा सुरू केला असून, सर्व शेतकऱ्यांनी या विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ. समाधान आवताडे यांनी केले आहे.