
पंढरपूर (प्रतिनिधी)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवार
दिलीप धोत्रे यांनी खर्डी येथील सिताराम महाराजांचे दर्शन घेऊन, प्रचारास शुभारंभ केला.खर्डी येथील प्रचार सभेस नागरिकांनी मोठी गर्दी केली. नागरिकांच्या प्रतिसाद पाहता त्यांच्या उमेदवारीस मोठे बळ मिळत असल्याचे दिसून आले. मी दगडफोड्याचा मुलगा , सत्ताधाऱ्याची सत्ता उलथून टाकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी या प्रचारसभेत व्यक्त केला.
मनसे नेते दिलीप धोत्रे यांची उमेदवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोलापूर दौऱ्यावर आली असता जाहीर केली. उमेदवारी जाहीर होताच , दिलीप धोत्रे यांनी सवंगड्यांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली. मंगळवेढा पंढरपूर मतदार संघातील अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या उमेदवारी बळ देण्यास सुरुवात केली. यामध्ये माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्यासह पंढरपूर आणि मंगळवेढ्यातील अनेक नेत्यांचा सहभाग आहे.
गुरुवार दि. तीन ऑक्टोबर रोजी त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील
सिताराम महाराजांचे दर्शन घेऊन करण्यात आला. यावेळी ॲड. यासीन शेख, नानासो कदम, यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होती.
महिला भगिनींना चावडीवर बोलवून सन्मान करण्याच्या प्रथेवर दिलीप धोत्रे यांनी कडाडून टीका केली. या नेत्यांपैकी आपण नसून प्रत्येक महिला भगिनीचा सन्मान त्यांच्या घरी जाऊन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या सात वर्षापासून अखंडपणे समाजसेवा करत असताना, कोणत्याही राजकीय लाभाची अपेक्षा आपण केली नाही. राज ठाकरे यांनी दिलेली जबाबदारी आता पार पाडायची आहे. जनतेने आपले काम पहिले आहे, ती निश्चित आपल्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास त्यांनी या प्रचार सभेत व्यक्त केला.