
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकली शिवसेना म्हणून केलेल्या टीकेचा, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. शिवसेना नकली असायला ती काय तुमची डिग्री आहे का ?
या शब्दात त्यांनी मोदींवर फलटवार केला. ते सोलापुरात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या, कर्णिक नगर येथील सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रणिती शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी दुपारी सोलापुरातील होम मैदानावर जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना मोदी यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही नकली असल्याची टीका केली होती. यावरून उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यासह फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.
भाजपाने लोकसभा निवडणुकीत चारशे पारचा नारा दिला आहे. त्यांना देशाचे संविधान बदलायचे आहे. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांनी लिहिलेल्या संविधानावर देश चालवायचा का ? अशी त्यांची भावना आहे. मी एवढे कष्ट करतो तरीही जनता मला काम मानत नाही ? असा सवाल त्यांच्या मनात वारंवार येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जनता का मानते ? असा सवाल ही त्यांना वारंवार सतावतो.
सोलापूरचे विद्यमान खा. डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या उमेदवारीवर बोलताना ठाकरे म्हणाले, स्वामी देखील हिंदुत्ववादी होते. ज्याप्रमाणे अमरावतीच्या नवनीत राणांचा जात प्रमाणपत्राचा प्रश्न सोडवला, त्याप्रमाणे हिंदुत्ववादी असलेल्या स्वामींच्या प्रमाणपत्राच्या प्रश्न का नाही सोडवला? असा सवालही ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच भाजपची वापरा आणि फेकून द्या ही कूटनिती स्वामीजींच्या देखील लक्षात आली आहे. त्यामुळे आता स्वामीजी यांनी भाजपला शाप द्यावा, असे खोचक आवाहन देखील ठाकरे यांनी यावेळी केले.
*फडणवीस यांचाही घेतला समाचार*
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी टरबूज, फडतूस, कलंक असा उल्लेख करणार नाही, कारण ते त्यांना झोंबत. असा टोला त्यांनी यावेळी लगावला. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान फडणवीस यांनी कोरोना काळात नरेंद्र मोदी यांनी देशाला लस देऊन सर्वांचे प्राण वाचवले, त्याचे आभार म्हणून मोदींना मत द्या, असे आवाहन केले आहे. लस मोदींनी दिली तर त्यावेळी शास्त्रज्ञ काय गवत उपटत होते काय ? शास्त्रज्ञांनी तयारी केलेली लस, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना दिली, याचा आपणास सार्थ अभिमान आहे, असे उद्गार यावेळी त्यांनी काढले.