राजकिय

देशाला मोदींसारख्या कणखर नेतृत्वाची गरज :आ. तानाजी सावंत

काँग्रेस सरकारच्या साठ वर्षांमध्ये काँग्रेसने फक्त प्रस्थापित लोकांचं भलं केले आहे. देशातील ८० टक्के विस्थापितांना त्यांनी आजपर्यंत न्याय दिलेला नाही. विस्थापितांचे भलं करण्यासाठी, कल्याण करण्यासाठी त्यांची आर्थिक प्रगती करण्यासाठी, भाजपाचे सरकार सत्तेवर येणे गरजेचे आहे. भाजपा सरकारच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये भ्रष्टाचार, जातीय दंगली, बॉम्बस्फोट, आर्थिक घोटाळे करणाऱ्यांवर अशा देशाला हानीकारक आणि जनतेला लुटू पाहणाऱ्या प्रस्थापित मंडळीवर कायद्याचा बडगा उगारला. तर ही काँग्रेस म्हणते, आम्ही हुकूमशाही सुरू केली आहे. चुकीची कारवाई हे सरकार करत आहे.असे खोटेनाटे आरोप काँग्रेस सध्या निवडणुकीच्या प्रचारद्वारांमधून करत आहे. असा आरोप आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी पंढरपूर येथील शिवतीर्थावर मनसेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत केला.

यावेळी व्यासपीठावर मनसे नेते दिलीप धोत्रे, आ. राम सातपुते यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री तानाजी सावंत म्हणाले की, तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील नागरिकांना करवाढ केली जाणार नाही. जनतेला विश्वासात घेऊन पंढरपूरचा कॅरीडॉर केला जाईल.यावेळी त्यांनी भाजप सरकारच्या राजवटीमध्ये देशभरामध्ये असंख्य सुधारणा झाली असल्याचे सांगत, देशभरातील रस्ते त्याचप्रमाणे गोरगरीब कष्टकरी जनतेला आपल्या हक्काचे घर त्यांनी दिले आहे. ग्रामीण भागामध्ये वीज पुरवली आहे. जल संजीवनीच्या माध्यमातून देशभरातील प्रत्येक गावोगावी पिण्याचे पाण्याचे नियोजन केले आहे. गोरगरीब जनतेला मोफत धान्य उपलब्ध करून दिले आहे. आरोग्याची हमी दिली आहे. अशी अनेक कामे ही भाजपाच्या सरकारच्या राजवटीमध्ये झालेली आहेत. आणि या योजना सध्या सुरू आहेत. आजपर्यंत काँग्रेसने लुटारुचे काम केले आहे. प्रस्थापित विरोधात विस्थापित अशी ही संघर्षाची लढाई सध्या सुरू आहे. सर्वसामान्य मतदार बंधूंनी आता प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापित या संघर्ष लढ्यामध्ये येत्या सात तारखेला भाजपाचे उमेदवार सोलापूर लोकसभा मतदारसंघातील राम सातपुते आणि माढा लोकसभा मतदारसंघातील रणजीतसिंह नाईक निंबाळकर या भाजपाच्या दोन्ही उमेदवाराला निवडून द्यावे, असे आवाहन डॉ. तानाजी सावंत यांनी पंढरपूर येथील शिवतीर्थावर मनसेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत केले.

यावेळी बोलताना मनसे नेते दिलीप धोत्रे म्हणाले की, उद्याच्या होऊ पाहणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, त्याचप्रमाणे राम सातपुते या दोन्ही उमेदवाराला मनसेच्या वतीने मी खात्री देतो की, दोन लाखाच्या वर मताधिक्याने हे दोन्ही उमेदवार निवडून येतील.

मोदी राजवटीमध्ये हिंदू बांधवांना अपेक्षित असलेले राम मंदिर, त्याचप्रमाणे ३७० कलम हटवून, त्यांनी खूप मोठे आणि चांगले काम केले आहे. त्याचप्रमाणे मुस्लिम महिलांना जाचक असलेला तीन तलाक हा कायदा रद्द केला आहे .या सर्व गोष्टीचा विचार करून भारत देशाला जागतिक स्तरावर उच्च पदावर नेण्याचे काम फक्त मोदी सरकारच करू शकतात. म्हणून मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचे मनसेच्या वतीने ठरविण्यात आलेले आहे. असे मत दिलीप धोत्रे यांनी प्रचार सभेत मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

 

यावेळी बोलताना आ. राम सातपुते म्हणाले की, प्रस्थापित आणि विस्थापित या दोन्हीच्या लढाईमध्ये मी विस्थापिताच्या बाजूने आणि एका राजकन्येच्या विरोधात एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा निवडणूक लढवीत आहे. असे वक्तव्य, सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी पंढरपूर येथील शिवतीर्थावर मनसे या पक्षाने आयोजित केलेल्या प्रचार सभेमध्ये बोलत असताना राम सातपुते यांनी केले.

मोदी सरकारने गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये सोलापूर या जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांना जोडणारे महामार्ग हे हजारो कोटी रुपये खर्च करून रस्ते बनवले आहेत. त्याचप्रमाणे पंढरपूर फलटण या रेल्वे मार्गाला मंजुरी तसेच निधी हा मंजूर केलेला आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेला मोफत राशन आणि गोरगरिबांना घरकुल योजनेच्या माध्यमातून हजारो गरिबांना घरी बांधून दिले आहेत. गोरगरिबांना गॅस उपलब्ध करून दिला आहे. यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बळ देण्यासाठी कमळ या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन सातपुते यांनी केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी आयोजित केलेल्या पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील हजारोंच्या संख्येने जाहीर सभेस राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत,मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, उमेदवार राम सातपुते,जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे ,लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, विद्यार्थी सेना उपाध्यक्ष अमर कुलकर्णी .शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख .पंढरपूर तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील .विधानसभा अध्यक्ष अनिल बागल. पत्रकार नगरसेवक महेश खिस्ते, इत्यादींनी संबोधित केले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवून सोलापूर जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.
या सभेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष, उपजिल्हा अध्यक्ष ,तालुका अध्यक्ष, उपतालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष,सर्व अंगीकृत संघटनाचे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक ,माता भगिनी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close