
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर मधील समाजसेवक संजय ननवरे यांच्या समाजकार्याचा वेग वरचेवर वाढतच असून, त्यांनी कामाचा धडाका उठवून दिला आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळवून देण्यात त्यांनी आघाडी घेतली आहे. झेंडे गल्लीतील रस्त्याचे काम पूर्ण होते न होते तोच, आता पाणीपुरवठ्याची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. आषाढी यात्रेपूर्वीच हे काम पूर्णत्वास जाणार असल्याने, येथील नागरिक ननवरे यांच्या कामावर जाम खुश आहेत.
मागील काही वर्षांपूर्वी गरजू नागरिकांना मदत करणारे संजय ननवरे यांनी, आपली नजर नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे वळवली. अनिलनगर परिसरातील समस्यांवर लक्ष केंद्रित केले. एका पाठोपाठ एक कामे मार्गी लागत गेली. एका वर्षात दोन रस्त्यांची कामे मार्गी लागली. सध्या एका रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे.
झेंडे गल्लीत मागील ४० वर्षापूर्वी टाकलेली पाणीपुरवठ्याची पाईपलाईन खराब झाली आहे. यामुळे येथील ३५ ते ४० कुटुंबांना पाणी मिळत नव्हते किंबहुना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत होता. याबाबत ननवरे यांनी नगरपरिषदेकडे पाठपुरावा केला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावर सुनील वाळुजकर यांनी, हे काम येत्या आषाढी यात्रेपूर्वीच केले जाईल, असे आश्वासन दिले. यामुळे येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.
आषाढी यात्रेत पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी असते. यामुळे साहजिकच पाण्याची मोठी आवश्यकता असते. समाजसेवक संजय ननवरे यांनी घेतलेल्या पुढाकारातून पाणीपुरवठा पाईपलाईनचे काम पूर्णत्वास जाणार असल्याने, येथील नागरिक सुखावले आहेत.