संत भूमी पंढरीत सर्वकाही आलबेल
भाविकांच्या सेवेसाठी मंदिर समिती तत्पर- ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर

पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरीतील विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कायम तत्पर असल्याची भूमिका मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी व्यक्त केली.
बुधवारी सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शन रांगेत गोंधळ झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, येथील वस्तुस्थिती वेगळीच होती. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची दर्शन रांग नेहमीप्रमाणे सुरळीत असून, भाविकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे मत मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी व्यक्त केले.
बुधवारी सकाळी दर्शन रांगेत ढकला ढकली झाल्याच्या बातम्या अचानक प्रसिद्ध झाल्या. परंतु तेथील परिस्थिती वेगळी होती. आषाढी यात्रेच्या अनुषंगाने पंढरपूर शहरात नगरपरिषदेकडून अनेक कामे सुरू आहेत. दर्शन रांगेजवळील रस्त्याचे काम सुरू होते.
यामुळे दर्शन रांगेचे बॅरिगेटिंग काढण्यात आले होते. यावेळी भाविकांनी शिस्त मोडून गर्दी केली होती. दर्शन रांगेत जरी गर्दी झाली होती, तरीही भाविक हरिनामाचा गजर करत पुढे सरकत होते. बॅरिगेटिंग काढल्यामुळे या ठिकाणी गर्दीचे वातावरण निर्माण झाले होते. हेच चित्र प्रसार माध्यमांकडून दाखवण्यात आले होते.