एमआयडीसी मंजुरीचे श्रेय घेण्याचा लोकप्रतिनिधींचा प्रयत्न
मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केली खंत

पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात एमआयडीसी मंजूर करण्यात आली आहे. पंढरपूर मंगळवेढ्याचे आ. समाधान अवताडे याप्रकरणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याची खंत, मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केली आहे. ते पंढरपूरमधील पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रसंगी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील एमआयडीसीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. कासेगाव येथे एमआयडीसी उभारण्यास काही दिवसापूर्वी औद्योगिक विकास महामंडळाची मंजुरी मिळाली आहे. याकामी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही प्रयत्न करण्यात आले होते. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी मात्र या कामाबाबतचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केला आहे.
दोनच दिवसापूर्वी आ. समाधान आवताडे यांनी पत्रकार परिषद घेऊन, एमआयडीसी उभारण्यास मंजुरी मिळाल्याचे पत्र आपण मिळवले असल्याचे सांगितले होते. यापूर्वीच पंढरपूर शहरात आ. अवताडे यांच्या स्वागताचे फ्लेक्स झळकले होते. मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी याप्रकरणी मोठा दावा करून, येथील नागरिकांपुढे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
यावेळी बोलताना दिलीप धोत्रे यांनी सांगितले की,
गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूर परिसरात एमआयडीसी उभारण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. यासाठी मनसेकडून पाठपुरावा सुरू होता. मात्र आपल्या संस्थेमध्ये कोण कामाला येणार नाही, या भीतीमुळे येथील नेतेमंडळींनी एमआयडीसी निर्मितीस विरोध केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून एमआयडीसी निर्मितीसाठी मनसेचे प्रयत्न सुरू होते. मात्र एमआयडीसी मंजूर झाल्यानंतर त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न येथील लोकप्रतिनिधी करत असल्याचा आरोप मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केला आहे. यामुळे पंढरपूर शहर आणि परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.