
पंढरपूर (प्रतिनिधी)
जातीपातीत चाललेले राजकारण आता जातीच्या पलीकडे जाऊन पोहोचले आहे. याला सर्वस्वी जबाबदार कोण आहे ? याचे चिंतन प्रत्येकालाच करावे लागणार आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी
अचानक मशाल हाती घेतली. हे कार्यकर्ते पूर्वी
स्व. गणपतराव देशमुख यांचे कार्यकर्ते होते. राजकारणातील बारकावे उघड्या डोळ्यांनी पहावे लागतात. काय चाललय ? कळतंय का, साहेबराव ?
सांगोला तालुक्याच्या राजकारणात या निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. येथील निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.
मुख्यमंत्री शिंदे गटाचा म्होरक्या या ठिकाणी निवडणुकीसाठी उभा आहे. शिवसेना फुटीच्या काळात या नेत्यास अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले होते. यावेळी हा नेता हिरो होता.. बाकी मात्र सगळे झिरो होते.
आता रणांगण समोर आहे. सांगोल्याच्या या रणांगणाकडे महाविकास आघाडीतील प्रत्येक प्रमुख नेत्याचे लक्ष आहे. म्हणून तर अचानक दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या हाती मशाल देण्यात आली. हीच मशाल आता सांगोला तालुक्यात धगधगू लागली आहे.
अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी अचानक मशाल हाती घेतल्याची बातमी सोशल मीडिया मधून प्रसिद्ध झाली. आणि येथील राजकारण किती सूक्ष्म पातळीवर होत आहे, याचा अंदाज आला. यापूर्वीही अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या फौजेत प्रवेश केला होता. अचानक होणारे शिवसेनेतील हे इनकमिंग कोणाला तारणार आणि कोणाला मारणार ? हे निवडणूक निकालानंतर समजणारच आहे.
काहीही झाले तरी येथील, महायुतीचा उमेदवार विजयी होऊ द्यायचा नाही ,याची पद्धतशीर बांधणी महाविकास आघाडीतील नेतेमंडळींनी केल्याचे दिसून येत आहे. यामुळेच शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष या ठिकाणी तळ ठोकून बसला आहे.
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आ. शहाजी बापू पाटील यातून काय मार्ग काढणार ?याकडे संपूर्ण सांगोला तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.