
पंढरपूर (प्रतिनिधी)
सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत युवकांचे शरीराकडे दुर्लक्ष होत आहे, नियमित व्यायाम केल्यामुळे शरीर व मन सुदृढ राहते. नवयुकांना शरीर सौष्ठवतेची आवड निर्माण करण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. युवा पिढीने नियमित व्यायाम करून तसेच योग्य व्यायाम करण्यासाठी मार्गदर्शन व सल्ला घेणे गरजेचे आहे, असे मत मिस्टर आशिया बॉडी बिल्डर सुनील आपटेकर यांनी व्यक्त केले.
सुनील आपटेकर हे मूळचे बेळगावचे असून, त्यांनी मिस्टर आशिया, मिस्टर इंडिया यासह तीन वेळा एकलव्य पुरस्कार मिळवला आहे. ते सोमवारी पंढरपूरमध्ये आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा प्रभारी अध्यक्ष अक्षय वाडकर, तात्या महाराज साळुंखे हे उपस्थित होते. या उभयतांच्या हस्ते बॉडी बिल्डर सुनील आपटेकर यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अर्जुन महाराज जाधव, मुकेश लकेरी, आबासाहेब जगताप, किशोर झेंड, प्रदीप साळुंखे, युगांधर साळुंखे हेही उपस्थित होते.
सोमवारी पंढरपूर येथील तात्या महाराज साळुंखे यांच्या निवासस्थानास सुनील आपटेकर यांनी भेट दिली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. युवकांनी व्यायाम करून शरीर सुदृढ बनवणे गरजेचे आहे. व्यसनापासून दूर राहून समाजातील दुर्लक्षित असणाऱ्या व्यसनाधीन युवकांना व्यायामाची आवड निर्माण करणे गरजेचे आहे. व्यायाम आणि आहार यांचा समतोल साधून तन आणि मन सुदृढ करणे आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. विविध क्रीडा क्षेत्रामध्ये सहभाग नोंदवून उत्तम करिअर करण्याची संधी युवकांना मिळू शकते, यासाठी व्यायामाची आवड निर्माण होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
गेल्या अनेक वर्षापासून अनेक शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन, नव्या पिढीतील युवकांना व्यायाम करण्याबाबत योग्य मार्गदर्शन आणि सल्ला देण्याचे काम नियमित करीत असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.