आमदारकीच्या विजयोत्सवात जिल्हा परिषद निवडणूकीची साखर पेरणी ?
आ. अभिजीत पाटील यांचा विजयोत्सव भोसे गावात पेढे वाटून साजरा

पंढरपूर (प्रतिनिधी)
अभिजीत पाटील हे जितके
निवडणुकीसाठी कायम तयारीत असतात , तितकीच तयारी त्यांच्या भोसे येथील कार्यकर्त्यांनी दाखवली आहे.आ. अभिजीत पाटील यांच्या विजयाचा गुलाल उधळीत, सबंध गावकऱ्यांना पेढे वाटून , जिल्हा परिषद निवडणुकीची साखर पेरणी केल्याचे दिसत आहे. येथील भारत बापू कोरके या नागरिकाने, सबंध गावकऱ्यांना पेढे वाटून, मोठे गुढ निर्माण केले आहे.
भारत वैजनाथ कोरके हे एक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असून, सद्गुरु कन्स्ट्रक्शन या नावाने त्यांचे फर्म आहे. त्यांचे वडील कै. वैजनाथ कोरके हे पंढरपूर बाजार समितीचे सदस्य होते. आई कै. कलावती वैजनाथ कोरके यांनी जिल्हा परिषद सदस्यपद भूषवले होते. राजकीय पार्श्वभूमी असणारा हा युवक नवनिर्वाचित आ. अभिजीत पाटील यांचा कार्यकर्ता आहे.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अभिजीत पाटील यांचा झेंडा खंबीरपणे पेलला होता. मागील काही वर्षापासून ते येथील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.
माढा विधानसभा मतदारसंघात अभिजीत पाटील यांची निवड होताच, भोसे गावात भव्य मिरवणूक संपन्न झाली. या मिरवणुकीतही हा शिलेदार मोठ्या हिरिरीने सहभागी होता.आ. अभिजीत पाटील यांनी भोसे गावात समर्थकांची मोठी फळी निर्माण केली आहे. सुमारे साडेसहा हजार मतदान असणाऱ्या या गावातून , जास्त मते घेणारा उमेदवारच आजवर जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाला आहे.
होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे आमदारकी पाठोपाठ वाहू लागले आहे.
नूतन आ .अभिजीत पाटील यांचा मोठा प्रभाव या निवडणुकीवर राहणार आहे. अभिजीत पाटील यांनी आमदारकीची निवडणूक जिंकताच, भारत बापू कोरके यांनी सबंध गावकऱ्यांना पेढे वाटप केले. सुदैवाने या निवडणुकीत अभिजीत पाटील यांना या गावातून ५८१ मतांची आघाडी मिळाली आहे. ही आघाडी टिकवून ठेवण्याचे काम आ.अभिजीत पाटील यांच्या भोसे येथील शिलेदारांना करावे लागणार आहे. त्यातीलच एक भाग हा पेढे वाटपाचा कार्यक्रम होता ,अशी चर्चा येथील ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे.
पंढरपूर तालुक्यात भोसे जिल्हा परिषद गट आहे. या गटावर कायमच विठ्ठल परिवाराचे वर्चस्व राहिले आहे. आ. अभिजीत पाटील यांची सत्ता विठ्ठल कारखान्यावर आली. आणि येथूनच या गटाचे राजकारण बदलून गेले. कधी काळी विरोधक न सापडणाऱ्या या गटात , आज अभिजीत पाटील गटाचे अनेक कार्यकर्ते निवडणुकीसाठी दंड थोपटून तयार आहेत.