आरक्षणाचा प्रश्न निकाली काढा
मराठा आरक्षण प्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यावर आ. अभिजीत पाटील आक्रमक

पंढरपूर (प्रतिनिधी)
गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी येत्या २५ डिसेंबर रोजी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. परंतु सरकारने याकडे लक्ष दिलेले दिसत नाही. अधिवेशनाच्या अभिभाषणात
या प्रश्नाचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला आहे. याबाबत नाराजी व्यक्त करीत माढा तालुक्याचे आ. अभिजीत पाटील यांनी, या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. जातनिहाय जनगणना करून , आरक्षणाचा प्रश्न कायमचा निकाली काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मराठा समाजाला दिलेला शब्द पाळण्यासाठी , त्यांनी सुरुवातीपासूनच लक्ष दिल्याचे दिसत आहे.
राज्यातील मराठा, धनगर, लिंगायत, महादेव कोळी आणि मुस्लिम समाज बांधव आरक्षणाची मागणी आक्रमकपणे करताना दिसत आहेत. या जातींच्या आरक्षण प्रश्नासंदर्भात योग्य मार्ग काढण्यासाठी, जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी , आ. अभिजीत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात केली आहे. मराठा आरक्षण प्रश्नी सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी , अशीही मागणी त्यांनी केली आहे.
मी येथे बोलणारा प्रत्येक बोल विठ्ठलाच्या आणि मतदारसंघातील मायबाप जनतेच्या मनातील असेल,भविष्याकडे जाणारे मार्ग उजळवण्यासाठी मी येथे आलो आहे, अशी ग्वाही मी देत आहे आणि सरकारनेही ती दिली पाहिजे, असे मत आ. अभिजीत पाटील यांनी संत तुकोबांची ओवी गात व्यक्त केले. आ. अभिजीत पाटील यांनी माढा मतदारसंघात मोठा विजय मिळवला आहे. येथील नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास टाकत , तीस वर्षाच्या सत्तेला लाथाडले आहे. याची जाणीव ठेवत आ. अभिजीत पाटील यांनी अधिवेशनात आपल्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली.
*धरण उशाला कोरड घशाला*
माढा तालुक्यात राज्यातील सर्वात मोठे उजनी धरण आहे. परंतु तालुका ठिकाण असणाऱ्या माढा शहरात , पिण्याच्या पाण्याची दयनीय अवस्था आहे. दहा दिवसातून एकदा या शहरात पाणी सोडले जाते. या ठिकाणची अशी अवस्था का ? असा प्रश्न विचारत, त्यांनी हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली.
*मेंढापूर आणि मोडनिंब एमआयडीसीला लवकर मान्यता द्या*
माढा मतदारसंघ अनेक वर्षापासून मागास आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागाचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. याकडे लक्ष वेधत , आ. अभिजीत पाटील यांनी मेंढापूर आणि मोडनिंब एमआयडीसीचा प्रश्न अधिवेशनात मांडला. या एमआयडीसींना लवकरात लवकर मान्यता देण्यात यावी, अशी मागणी केली.
*साखरेचे भाव वाढवण्यासाठी सरकारने पाठपुरावा करावा*
महाराष्ट्र राज्यात साखर कारखाने मोठ्या प्रमाणावर आहेत. साखर उद्योगावरच या भागातील आर्थिक गणित अवलंबून आहे.
यासाठी साखर उद्योग सुरळीत चालणे गरजेचे आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक लाभ होण्यासाठी साखरेचे भाव वाढणे गरजेचे आहे. तरच ऊसाला जास्तीचा भाव देणे,
साखर कारखानदारांना शक्य होणार आहे. यासाठी साखरेचा हमीभाव वाढवण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे मत आ. अभिजीत
पाटील यांनी व्यक्त केले.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याचे आ. अभिजीत पाटील , या नेतृत्वाकडे सबंध राज्याचे लक्ष आहे. बुधवारी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात , मतदारसंघातील
मागण्यांबाबत हे नेतृत्व आक्रमक झाले. मराठा आरक्षणासह , इतर अनेक विकासाच्या मुद्द्यांवर त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.