
पंढरपूर (प्रतिनिधी)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा देशभरातून सर्वत्र निषेध होत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही होत आहे. अमित शहा यांच्याबरोबर खा. रामदास आठवले यांनीही राजीनामा देऊन , केंद्रीय सत्तेतून बाहेर पडावे अशीही मागणी केली जात आहे. देशभरात अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल
जोरदार निषेध केला जात असतानाच , आ.राजू खरे या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदाराने अमित शहा यांचा आगळा वेगळा निषेध नोंदवला आहे. स्वतःच्या गळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा अडकवून आ. राजू खरे हे विधिमंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध नोंदवला. या घटनेचे पडसाद विधान भवनात उमटले . गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी आमदारांनी लावून धरली.
राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केले होते. या घटनेबद्दल भाजपा पक्षाने माफी मागावी , अशी भूमिका अनेक राजकीय पक्षांनी घेतली आहे. याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधिमंडळातही उमटले आहेत.
राज्य सरकारचे सध्या हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. राज्यात महायुतीचे सरकार बहुमताने निवडून आल्याने , या ठिकाणी कोणताही आमदार स्वतः निषेध नोंदवणार नाही ,
अशी परिस्थिती असताना मोहोळ तालुक्याचे आमदार राजू खरे यांनी विधिमंडळात प्रवेश केला, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो गळ्यात अडकवून. या घटनेचे पडसाद
विधिमंडळात मोठ्याने उमटले. विरोधी पक्षातील आमदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध नोंदवण्यास सुरुवात केली. स्वतः आ. राजू खरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची ही मागणी केली.
भारतीय जनता पार्टीला केंद्रात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे समर्थन आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात खा. रामदास आठवले यांचा समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल , रामदास आठवले यांनी राजीनामा देऊन, सत्तेतून बाहेर पडावे अशी मागणी अनेक पक्षातील नेत्यांनी केली होती. परंतु राज्यात आ. राजू खरे यांनी आठवले यांची भर भरून काढली आहे. राज्यातील भाजप सरकारला मोठी चपराक दिली आहे.