
पंढरपूर (प्रतिनिधी)
दरवर्षी आषाढी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, यात्रा कालावधीत चांगला मुहुर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना २४ तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. यावर्षी दि. ७ जुलै रोजी चांगला दिवस असल्याने, विधिवत पुजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला आहे. विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड; तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे २४ तास मुखदर्शन, तर २२.१५ तास पदस्पर्श दर्शन सुरू राहणार असल्याचे, सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगीतले.
श्रींचा पलंग काढल्याने काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती आदी राजोपचार बंद होवून नित्यपुजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील. दि. २६ जुलै (प्रक्षाळपुजा) पर्यंत २४ तास दर्शन उपलब्ध असणार आहे. श्रींचा पलंग काढताना, पुजेवेळी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, विभाग प्रमुख संजय कोकीळ, अतुल बक्षी, बलभीम पावले व पौरोहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते.