उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे
पराभूत उमेदवार, ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची पुन्हा विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या या पराभूत उमेदवाराची
पुन्हा नेमणूक होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसकडून व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत ट्विट केले आहे.
उच्च न्यायालयातील विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली होती. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पराभवानंतर फक्त बाराच दिवसात त्यांची नियुक्ती पुन्हा विशेष सरकारी वकील म्हणून करण्यात आली आहे. या नियुक्तीस काँग्रेसने जोरदार विरोध केला आहे.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड आणि विधीज्ञ उज्वल निकम यांच्यात जोरदार सामना पहावयास मिळाला. मुंबईतील सहापैकी पाच लोकसभेच्या जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत.
उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी भाजपचे उमेदवार उज्वल निकम यांचा पराभव केला आहे. देशभक्त म्हणून भाजपने निकम यांना उमेदवारी दिली होती. परंतु त्यात त्यांचा टिकाव लागला नाही. आता पुन्हा विशेष सरकारी वकीलपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्याकडील खटले पुन्हा त्यांना चालवता येणार आहेत. निकम हे भाजपचे पराभूत उमेदवार आहेत, यामुळे या नियुक्ती विरोधात कॉंग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत ट्विट केले आहे.