
पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळू शकले नाही. परिणामी संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी फळवणी चौकात शुक्रवारी आंदोलन उभारले. निरा उजवा कालव्याच्या शाखा अभियंत्यास घेराव घालण्यात आला. आधी पाणी येऊ द्या, मगच तुम्हास सोडतो अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. या आंदोलनामुळे
या परिसरात मोठी खळबळ उडाली.
भाळवणी परिसरास निरा उजवा कालव्यामधून
शेतीसाठी पाणी मिळते.भाळवणी शाखा क्रमांक दोन कालव्यावर एकूण १७ पाणी वापर संस्था आहेत. सर्वांना उन्हाळा हंगामासाठी कोटा निश्चित करून दिलेला असताना देखील, आठ तारखेपासून मुख्य कॅनॉल कोरडा पडलेला आहे. याची झळ शेतकऱ्यांना बसल्यामुळे, शेतकरी वर्ग संतप्त झाला. शेतकऱ्यांनी फळवणी चौकी ९१ मैंल येथे शुक्रवारी सकाळपासून आंदोलन सुरू केले.
या आंदोलनात शेतकऱ्यांनी शाखा अभियंता चक्के यांना घेराव घातला. पाणी येऊ द्या मगच तुम्हाला सोडतो, अशी आक्रमक भूमिका घेतली. वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रेगुडे यांनी आचारसंहितेचे कारण पुढे करत, आंदोलन करता येत नाही म्हणून समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तरीही संतप्त शेतकऱ्यांनी वरिष्ठ अधिकारी यांना बोलावून कशा पद्धतीन इरिगेशन होणार आहे, हे आधी स्पष्ट करा, अन्यथा आम्ही जागा सोडणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली.
यावेळी नागेश काकडे, दीपक पवार, सुरेश देठे, विजय पवार, दीपक गवळी, विजय शिंदे, यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.