पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिराचे संवर्धन सुरू असताना, अचानक मंदिरात तळघर असल्याचे आढळून आले. या तळघरात तीन मोठ्या मुर्त्या एक लहान मूर्ती आणि पादुका सापडल्या.
या मुर्त्या पंधराव्या अथवा सोळाव्या शतकातील असल्याचा अंदाज पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. आता हे तळघर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी बुजवण्यात येणार आहे. परंतु सापडलेल्या मुर्त्यांचे काय होणार ? याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.
भगवान विष्णूच्या अवतारातील एक मूर्ती तसेच महिषासुर मर्दिनीच्या रूपातील एक तीन फुटी मूर्ती या तळघरात सापडली आहे. या मुर्त्या पंधराव्या अथवा सोळाव्या शतकातील असल्याचा अंदाज पुरातत्व खात्याचे संचालक विलास वाहने यांनी व्यक्त केला आहे. या सापडलेल्या मुर्त्या आक्रमण काळात लपवून तर ठेवल्या नव्हत्या ना ? ही विठ्ठलाची मूळ मूर्ती तर नव्हे काय ? असा प्रश्न राज्यातील भाविकांना पडला होता. दरम्यान या मुर्त्यांचा पुरातत्व खात्याकडून अभ्यास करण्यात येणार आहे. मात्र विठ्ठल मंदिरात हनुमान दरवाज्याच्या जवळ सापडलेले हे तळघर बुजवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे. सापडलेल्या मुर्त्यांच्या अभ्यासात काय निष्पन्न होणार, याकडे भाविकांचे लक्ष लागून राहिले आहे.