
पंढरपूर (प्रतिनिधी)
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस नंदकुमार नागू जगताप, भाळवणी (ता. पंढरपूर) यांनी सुमारे ५५० ग्रॅम वजनाची चांदीची फुलदाणी तसेच, सुहास शिवाजी मरळ, पुणे यांनी ९९६ ग्रॅम वजनाचे दोन बाऊल भेट दिल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
सदरच्या दोन्ही वस्तूची अनुक्रमे ४४ हजार व ८८ हजार इतकी किंमत होत आहे. संबंधित देणगीदार जगताप यांचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच मरळ यांचा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर यांच्या हस्ते श्रीची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी देणगीदार यांचे कुटुंब, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी, सराफ गणेश भणगे व सुपेकर उपस्थित होते. श्री विठ्ठल रुक्मिणीमातेस सोने चांदी भेट स्वीकारण्यासाठी स्वतंत्र विभागाची निर्मिती, यासाठी अनुभवी विभाग प्रमुख तसेच तज्ञ दोन सराफाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संगणक प्रणाली देखील विकसित करण्यात आली असून, भाविकांना संगणकीकृत पावती देण्यात येते.