वादळी वाऱ्याच्या तडाख्यात उरली सुरली केळीही झोपली
भोसे येथील थिटे कुटुंबाची ५ एकर केळी जमीनदोस्त

पंढरपूर (प्रतिनिधी)
पावसासह येणाऱ्या वादळी वाऱ्याने संपूर्ण राज्यात हाहाकार माजवला आहे.
पंढरपूर तालुक्यात हजारो हेक्टर फळबागा आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे. भोसे येथील पोपट पांडुरंग थिटे या शेतकऱ्याची पाच एकर केळी जमीनदोस्त झाली आहे.
पंढरपूर तालुक्यात रविवार दि. २६ मे रोजी मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला. भटुंबरे येथील एक महिला विजेच्या इतक्याने मृत्यू पावली. शेतकऱ्यांची हजारो हेक्टर पिके वाया गेली.
रविवारी सायंकाळी भोसे परिसरात या पावसाचा मोठा तडाका शेतकऱ्यांना बसला. पोपट पांडुरंग थिटे या शेतकऱ्याची मागील पावसात दोन एकर केळी जमीनदोस्त झाली होती. उरलेली तीन एकर केळी बागही या पावसाने जमीनदोस्त झाली. निर्यातक्षम गुणवत्तेची केळी शिवारात बहरत असताना, अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस आला, आणि होत्याचे नव्हते झाले. याबाबत बोलताना शेतकरी थिटे
यांना भावनांना आवर घालता आला नाही.
पाच दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस आला, या पावसाने दोन एकर केळी उध्वस्त झाली. उरलेली तीन एकर केळी उत्तम गुणवत्तेची होती. हा माल परदेशात पाठवण्याच्या गुणवत्तेचा होता. याची तयारी आम्ही केली होती. परंतु अचानक रविवारी काळाने घाला घातला. तुफान वाऱ्याच्या वेगात सरी बरसू लागल्या. या पावसात तीन एकर केळी क्षणार्धात जमीनदोस्त झाली. सरकार नुकसान भरपाई देईल तेव्हा दे, परंतु शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून येण्यासारखे आहे.
पोपट पांडुरंग थिटे,
नुकसान बाधित शेतकरी.